
मुंबई, दि. ९ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी आणि मराठीचे विविध पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून मरीन ड्राइव्ह येथे उभारण्यात येत असलेले मराठी भाषा भवन डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
मरीन ड्राइव्ह येथे सुसज्ज असे मराठी भाषा भवन उभारण्यात येत असून मंत्री डॉ. सामंत यांनी मराठी भाषा भवनाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाचे सह सचिव डॉ. नामदेव भोसले, संचालक अरुण गीते, संचालक रूपेंद्र मोरे, अवर सचिव श्रीमती देशमुख, विश्वकोशचे सचिव देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे आदी उपस्थित होते.
मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषा भवनाच्या कामाला काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला होता. मात्र आता भाषा भवनाचे काम वेगाने सुरू आहे. मरीन ड्राइव्ह येथे उभारण्यात येत असलेले मराठी भाषा भवन हे भवन केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतातील भाषाविषयक क्षेत्रात एक उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तू ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सात मराठी भाषा विकास केंद्रे
मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील सात ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सात केंद्रे रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती येथे उभारली जाणार आहेत. ही सात केंद्रे मराठी भाषा, विविध बोलीभाषा, साहित्य आणि संशोधन यांना चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. संशोधक, साहित्यिक, विद्यार्थी तसेच नव्या पिढीतील अभ्यासकांना या केंद्रांचा मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास मंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.
लंडन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज जागतिक मराठी भाषा केंद्र’
मंत्री डॉ. सामंत म्हणाले, जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार करण्यासाठी लंडन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज जागतिक मराठी भाषा केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. पुढील काही महिन्यांत हे केंद्र कार्यान्वित होणार असून मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा ध्वज प्रदेशात फडकविण्याची संधीही मिळणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा, तिच्या बोलीभाषा आणि विविध सांस्कृतिक पैलू समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी याचा अधिक उपयोग होईल असेही ते म्हणाले.
0000
एकनाथ पोवार/ससं
