
मुंबई, दि. ९: छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेची अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत ‘प्रशासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुटखा माफियांची गय केली जाणार नाही,’असा इशारा दिला. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री झिरवाळ म्हणाले, “शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत शासन आणि प्रशासन अत्यंत गंभीर आहे. या कठीण काळात शासन त्या महिला अधिकारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
या प्रकरणातील दोषींवर आणि संबंधित गुटखा माफियांवर कठोरतम कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले असून, गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गुटखा आणि बनावट अन्नपदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमांमुळे अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, अशा कारवायांना अडथळा आणण्यासाठी काही समाजविघातक प्रवृत्तींकडून हल्ल्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अशा दबावतंत्राला बळी न पडता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “कायदा सुव्यवस्था कायम राखत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
००००
किरण वाघ/विसंअ
