
मुंबई, दि. ९ : राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू केली आहे. या एकात्मिक डिजिटल व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सेवांसाठी एकाच व्यासपीठावर सुविधा उपलब्ध झाली असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालाबाबत तसेच उपकेंद्र स्थापन करणेबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. अमित शेष, अधिष्ठाता (संशोधन व विकास) डॉ. एस. एम. पोरे, परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामूणकर, डॉ. मुकुंद कुलकर्णी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अभियांत्रिकी आणि फार्मसी या दोन्ही विद्याशाखांतील उन्हाळी व हिवाळी सत्रांचे सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यात आले आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल प्रसिद्ध करून विद्यापीठाने ‘शून्य निकाल प्रलंबितता’ हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य केले आहे. परीक्षा दिल्यानंतर निकालाच्या प्रतीक्षेत असलेला कालावधी हा विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक तणावाचा असतो. मात्र, वेळेत निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, रोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध होणार असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियोजन, ईआरपी प्रणालीतील सुधारणा आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे हे यश शक्य झाले आहे. सध्या केवळ ९६२ निकाल तांत्रिक कारणांमुळे, जसे की परीक्षा अर्ज न भरणे किंवा महाविद्यालयांकडून अंतर्गत गुण वेळेत प्राप्त न होणे, तात्पुरते प्रलंबित असून संबंधित प्रक्रिया पूर्ण होताच हे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच अभियांत्रिकी व फार्मसी या दोन्ही विद्याशाखांमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक उत्तीर्णता नोंदविली आहे. विशेषतः सातव्या आणि आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८४ ते ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा हा सकारात्मक निर्देशांक असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ ही डिजिटल सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात आमूलाग्र बदल घडवणारी एकात्मिक व्यवस्था आहे. यापूर्वी गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन अर्ज, स्थलांतर प्रमाणपत्र किंवा इतर शैक्षणिक सेवांसाठी विद्यार्थ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागत होते. आता परीक्षा अर्जापासून निकाल, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे तसेच तक्रार निवारणापर्यंतच्या सर्व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होतील.
विद्यापीठाच्या सेवा विद्यार्थ्यांपर्यंत सहज, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे गरजेचे आहे.तसेच विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवोपक्रम या त्रिसूत्रीवर आगामी काळात विशेष भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून निकाल प्रक्रियेतील उल्लेखनीय यशाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
बैठकीत विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.
००००
काशीबाई थोरात/विसंअ
