Pune | Mon, 16 March 2026

Ad

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 1 views
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मुंबईतील मध्यमवर्गीयाच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगून बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपली घरे विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होता यामध्ये अनेक अडचणी होत्या. यामुळे राज्य शासनाने निर्णय घेतला की, व्यावसायिक बिल्डरवर भरवशावर अवलंबून न राहता हा प्रकल्प राज्य शासन करेल. देशातील सर्वोत्तम कंपन्यांना हे काम देऊन हा प्रकल्प उत्तमरित्या तयार झाला. मुंबईतील इतर पुनर्विकासाचे काम वेगाने झाले पाहिजे यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू असून २०२९ पर्यंत सर्व घराच्या चाव्या रहिवांशाना  देण्याचो उद्द‍िष्ट्य आहे.

नायगाव, वरळी या ठिकाणची कामे अतिशय सुंदर झाली आहेत. बीडीडी येथील रहिवांशाना  सर्व पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. नायगाव येथील पार्किंगच्या समस्येबाबत मार्ग काढू असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या ठिकाणी असलेल्या भवानी माता मंदिराबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी ९०० चौरस फूट जागा दिली जाणार आहे. बीडीडी चाळीला फार मोठा इतिहास आहे अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा नवरत्नांची खाण या बीडीडी चाळीत राहिलेली आहे. यावर पुस्तक लिहिले पाहिजे असा मानसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील अनेक ठिकाणी चाळीत राहणाऱ्या नागरिकांना अडचनिंचा सामना करावा लागतो. सामान्य माणसामुळे मुंबई आहे. संस्कृती जपणारा मुंबईकर आहे. मुंबईतील व्यक्तींना मुंबईतच घर मिळाले पाहिजे. जेवढे प्रकल्प हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीसांना हक्काचे घर मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या घराच्या किमतीच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तो सोडवला जाईल, तसेच यासाठी लागणारे समग्र धोरण तयार करावे लागेल. २०१६ मध्ये पोलिसांना मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी धोरण आणले आहे, त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच यासाठी कायदेशीर व्यवाहारिक मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुर्नविकासाबाबत मुंबईमधील जवळपास एक हजार एकरचे पुर्नविकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात मुंबई बदलणार आहे सामान्य माणसाला घर मुंबईत मिळणार आहे. सामान्य माणसाचे जीवनात बदल घडवून राज्य शासन प्रयत्नशील आहे. बीडीडी वासीयांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार असून नागरी पुनरुत्थानाच्या दृष्टीने आशिया खंडातील पहिला व सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या १६० चौ. फूट घरांऐवजी रहिवाशांना सुमारे ५०० चौ. फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त टू बीएचके सदनिका विनामूल्य देण्यात येत आहेत.

सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस आहे. बीडीडीमध्ये राहणारे आता टॉवर मध्ये राहणार. किती तरी वर्षाची त्यांची स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे. या चाळीमध्ये पिढ्यान् पिढ्याचा स्वतःचा लढा, अनुभव,  भावनिक, सांस्कृतिक ऋणानुबंध बांधले गेले आहेत. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर, सुख-सुविधा मिळाले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. १९ तारखेला गुढी उभारण्याचा आनंद येथील रहिवाशांना मिळणार आहे. पोलीस उन्हातानात आपली कर्तव्य बजावत असतात त्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बीडीडी मधील रहिवाशांचा १२ वर्षाचा मालमत्ता कर म्हाडा भरणार आहे. बाहेर फेकला गेलेला मुंबईकर मुंबईत परत आणण्याचे काम अशा प्रकल्पाच्या माध्यमातून हे राज्य शासन करत आहे. क्लस्टर, एसआरए सारख्या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरे मिळत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रासाठी शासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला असून गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून ७० कोटींची गुंतवणूक व तीस लाख लोकांना पर्यावरण पूरक घरे उपलब्ध होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

८६४ लाभार्थ्यांना हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द हा सुवर्णक्षण – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जवळजवळ चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येत आहे. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट-विटांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचं, आशा-आकांक्षांचं प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

1920 च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या, इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. मात्र, या चाळींचा इतिहास हा केवळ इमारतींचा इतिहास नाही; तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास चार दशके येथील रहिवासी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घराच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून, बीडीडीवासीयांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,  सभापती प्रा. राम शिंदे, अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा ॲङ आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर रितू तावडे, आमदार चित्रा वाघ, कालिदास कळमकर, मनीषा कायंदे, सिद्धिविनायक न्यायाचे अध्यक्ष सदा सरवणकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य अधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळचे मिलिंद बोरीकर यांनी मानले.

००००

प्रविण भुरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp