
मुंबई, दि. १४ : मुंबई येथील एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील सिलोन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळासोबत परस्पर संवाद बैठक पार पडली. उद्योजक, निर्यातदार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग प्रतिनिधी आणि व्यावसायिकांनी या बैठकीत सहभाग घेतला.

मुंबई येथील श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत प्रियांगा विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेतील उद्योगक्षेत्र हे भारतीय उद्योगांबरोबर भागीदारी वाढविण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. लॉजिस्टिक्स, पर्यटन, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी श्रीलंकेतील १७ प्रमुख उद्योग समूहांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऑक्टोबर २०२६ मध्ये होणाऱ्या श्रीलंका आर्थिक आणि गुंतवणूक परिषदेत भारतीय उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही विक्रमसिंघे यांनी केले.

मुंबई येथील ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या वरिष्ठ संचालक संगीता जैन यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

सिलोन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा जॉन कील्स होल्डिंग्स पीएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण बालेंद्र यांनी भारताच्या नजीकच्या भौगोलिक स्थानामुळे श्रीलंका हा प्रादेशिक व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगितले. बैठकीनंतर भारतीय आणि श्रीलंकन उद्योग प्रतिनिधींमध्ये सविस्तर चर्चा आणि नेटवर्किंग सत्र पार पडले.
००००
