
मुंबई, दि. १३: भंडारा येथील स्त्री रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयाच्या सद्यस्थितीबाबत वस्तुनिष्ठ चित्र समोर येण्यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्राधान्याने अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
भंडारा येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीचा विस्तृत आढावा यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी घेतला. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भंडारा येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक, जिल्हाधिकारी, रुग्णालयाच्या अधिष्ठाता, भंडाऱ्याचे कार्यकारी अभियंता आणि अन्य संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
स्त्री रुग्णालयाच्या सुविधा सर्वसामान्य रुग्णांना सुलभपणे उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. रुग्णालयाच्या सद्यस्थितीबाबत वस्तुनिष्ठ चित्र समोर येण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे नागपूर येथील सह संचालक, रुग्णालयाच्या अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्राधान्याने अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने भंडाऱ्यातील स्त्री रुग्णालयासंदर्भातील निर्णय प्रक्रियेला गती द्यावी. रुग्णालयाची कार्यपद्धती, उपलब्ध सुविधा तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
बैठकीदरम्यान संबंधित प्रकरणातील पत्रव्यवहार आणि प्रशासनिक बाबींचा आढावा घेण्यात आला.
००००
