Pune | Mon, 29 June 2026

Ad

छत्रपती संभाजीनगर, जालनामधील बनावट कागदपत्राद्वारे दस्त नोंदणी प्रकरणी तातडीने कार्यपूर्ती अहवाल द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Sunil Goyal | 8 views
छत्रपती संभाजीनगर, जालनामधील बनावट कागदपत्राद्वारे दस्त नोंदणी प्रकरणी तातडीने कार्यपूर्ती अहवाल द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १० : छत्रपती संभाजीनगर, जालना व मालेगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून दस्त नोंदणी करणे, खोटे खरेदीखत करून मालमत्ता विकण्याचे प्रकार हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असून अशा प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाईसाठी पोलीस व मुद्रांक विभागाने टास्क फोर्स तयार करावे व केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल पुढील मंगळवारपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीपुढे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बनावट कागदपत्रे बनवून दस्त नोंदणी केल्या प्रकरणी आज मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, उपस्थित होते. तसेच मुद्रांक महानिरीक्षक रविंद्र बिनवडे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, जालनाचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासह पोलीस अधिकारी, सहकार विभागाचे सहनिबंधक आदी ऑनलाईन उपस्थित होते.

मंत्री श्री.सावे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडला होता. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंत्री बावनकुळे यांनी बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बनावट खरेदीखते, खोटी वारस प्रमाणपत्रे, दस्तांमध्ये फेरफार, शासनाची फसवणूक, दुबार विक्री आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असून काही प्रकरणांचा तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणांमागे कार्यरत असलेल्या संघटित साखळीचा शोध घेऊन दोषींना कठोर शिक्षा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून नागरिकांच्या मालमत्ता परस्पर विकण्याचा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनावट दाखले तयार करणे, बनावट व्यक्ती उभे करून दस्त नोंदणी करून शासनाची दिशाभूल केली आहे. आतापर्यंत १६ गुन्हे दाखल झाले आहेत. संघटितरित्या गुन्हे करणाऱ्या अशा लोकांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही तर गांभीर्याने तपास करून संबंधिताविरुद्ध मोका अथवा तडीपारसारखी कारवाई करावी.

मंत्री सावे यांनी सांगितले की, बनावट कागदपत्रे बनवून दस्त नोंदणी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असले तरी संबंधितांवर अजामिनपात्र गुन्हे दाखल केले जावे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. पोलिसांनी तपास केल्यास आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी मुद्रांक विभाग व पोलीस विभागाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp