Pune | Wed, 18 March 2026

Ad

एचपीव्ही लसीकरण मोहीम : मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

Sunil Goyal | 3 views
एचपीव्ही लसीकरण मोहीम : मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी एचपीव्ही (Human Papilloma virus) लसीकरण अत्यंत प्रभावी मानले जाते. याच पार्श्वभूमिवर राज्य शासनातर्फे १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी विशेष एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून, ती आगामी 90 दिवस चालणार आहे. या मोहिमेमुळे किशोरवयीन मुलींना भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व त्यांची संपूर्ण आरोग्य यंत्रणा या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज आहे.

पात्र लाभार्थी

या मोहिमेत १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या कालावधीत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलीदेखील या मोहिमेस पात्र राहतील. साधारणपणे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का मुली या मोहिमेच्या लाभार्थी असतील, असा अंदाज आहे.

कोणती लस दिली जाणार?

या मोहिमेत गार्डसिल 4 (Quadrivalent HPV Vaccine) ही लस वापरण्यात येणार आहे. ही लस ०.५ मि.ली. प्रमाणात स्नायूमध्ये (Intramuscular) डाव्या हाताच्या वरच्या भागात दिली जाते. या मोहिमेत लाभार्थींना एकच डोस देण्यात येईल. लसीकरण झाल्यानंतर लाभार्थीच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेनने खूण करण्यात येईल.

लसीची साठवण व सुरक्षितता

लस +२°C ते +८°C तापमानात कोल्ड चेन प्रणालीद्वारे सुरक्षितपणे साठवली जाईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून काही वेळा सौम्य दुष्परिणाम जसे की हलका ताप, सूज किंवा वेदना जाणवू शकतात. हे दुष्परिणाम बहुधा दोन दिवसांत आपोआप कमी होतात आणि शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाचा नैसर्गिक भाग असतात.

लसीकरणाची ठिकाणे

लसीकरण सत्रे विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र / UPHC), ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा समावेश असून, या ठिकाणी कोल्ड चेन सुविधा, इंटरनेट, संगणक तसेच AEFI (Adverse Event Following Immunization) व्यवस्थापनासाठी किमान एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील. लसीकरण सत्रे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात येतील.

डिजिटल नोंदणी

सर्व लाभार्थींची नोंदणी व लसीकरणाची माहिती U-WIN या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदविण्यात येईल. लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्वनोंदणी करून अपॉईंटमेंट घेऊ शकतात किंवा थेट येऊन (Walk-in) नोंदणी करू शकतात. लसीकरणानंतर प्रमाणपत्र देखील U-WIN पोर्टलवर उपलब्ध होईल.

पालकांची संमती आवश्यक

एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक असून मुलींच्या लसीकरणापूर्वी पालकांची संमती घेणे अनिवार्य आहे. ही संमती U-WIN पोर्टलवर डिजिटल पद्धतीने किंवा इंटरनेट उपलब्ध नसल्यास निर्धारित नमुन्यात हार्ड कॉपीवर घेण्यात येईल.

हेल्पलाईन सुविधा

लसीकरण किंवा दुष्परिणामांबाबत काही शंका असल्यास १०४ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. लसीकरण प्रमाणपत्रावर जवळच्या २४x७ AEFI व्यवस्थापन केंद्राचा पत्ता व हेल्पलाईन क्रमांक देखील नमूद असेल.

मोहिमेचा कालावधी

ही मोहीम ९० दिवस (तीन महिने) राबविण्यात येणार असून त्यानंतर एचपीव्ही लसीचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

एकूणच एचपीव्ही लसीकरण मोहीम ही मुलींच्या दीर्घकालीन आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पालकांनी या मोहिमेबाबत जागरूक राहून पात्र मुलींना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

संकलन – संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp