Pune | Mon, 20 April 2026

Ad

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे

Sunil Goyal | 2 views
एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

पुणे, दि. २०: यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीकपद्धतीचे नियोजन करावे, त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील , यादृष्टीने आवश्यक सुक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वितरक आणि दुकांनदारावर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे यांनी दिले.

छत्रपती शाहू संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) सभागृहात खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मीनल करनवाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.

गतवर्षी अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन मदत मिळेपर्यंत कृषी विभागाने अतिशय चांगले काम केल्याबद्दल श्री. भरणे यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात, त्यांचा विभागावर मोठ्याप्रमाणात विश्वास असतो. कृषी विभागाचा सल्ल्यानुसार ते शेती करीत असतात, त्यामुळे अधिकाऱ्यांने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करावे. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासोबतच त्यांची फसवणूक टाळण्याच्यादृष्टीने बियाणांची तपासणी वेळेत करावी. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर ताबडतोब कार्यवाही करावी. तसेच युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता खतांचा साठा होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. युद्धजन्य परिस्थितीमुळे युरिया खताची टंचाई भासल्यास शेतकऱ्यांना पर्यायी खताचा वापर करण्याबाबत तपासणी करावी,जलंसधारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे.

प्रतिकुल हवामान, अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टीच्या धर्तीवर कृषी विद्यापीठाने संशोधन करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्यादृष्टीने नवनवीन वाण उपलब्ध करुन दिले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा पात्र  लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होण्यासोबतच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्यादृष्टीने सामूहिक प्रयत्न करावे.

आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारीला सुरुवात केली असून या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शंकाचे निरसन करण्यात यावे, माहितीची देवाण-घेवाण करावी, विधायक सूचना कराव्यात, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी उपायोजना कराव्यात, त्याची कृषी आयुक्तालयाच्यावतीने नोंद घेवून कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. भरणे म्हणाले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एल निनो’ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये कृषी विभागाचा आढावा सादर करण्यात आला आहे. जलसंधारणाची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावी, वैरण विकास कार्यक्रम राबविण्याकरिता कृषी विभागाने अग्रेसर राहून कामे करावीत. ॲग्रीस्टॅक योजनेला आयएफएमएस पोर्टलशी संलग्न करावे. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यादृष्टीने कामे करावीत, असेही श्री. मांढरे म्हणाले.

याकार्यशाळेत भारतीय हवामान शास्त्र विभाग, खरीप नियोजन -२०२६, महाबीज, कृषी विद्यापीठ सर्व संचालक (विस्तार), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मा.  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींचे सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घ्यावा.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, कृषी विभागाचे सर्व उपसचिव,सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक, सर्व कृषी संचालक,सर्व विभागीय कृषी संचालक,सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक, कृषी उप संचालक व काही शेतकरी उपस्थित होते.

000

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp