
मुंबई, दि. १९ : राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे हजारो जलसाठ्यांची क्षमता वाढली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे ३,२६८ जलसाठ्यांमधून आतापर्यंत ७.७३ कोटी घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे ७७ लाख पाण्याच्या टँकर इतकी जलसाठवण क्षमता पुनर्संचयित झाली असून ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात नेला, त्यापैकी ९१ टक्के शेतकरी वंचित घटकांतील आहेत.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात योजनेला अधिक गती मिळाली असून १,३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे जवळपास २६ हजार शेतकऱ्यांना फायदा झाला. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांत अनुक्रमे ३२ लाख आणि १६ लाख घनमीटर गाळ मंजूर करण्यात आला असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३०० टक्के वाढ झाली आहे.
तसेच गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यांतही योजनेच्या कामांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यभरातील ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून ही योजना राबविण्यात येत असून जलसाठे पुनरुज्जीवित करण्यास मदत होत आहे.
राज्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने जलसाठा वाढविणे आणि भूजल पुनर्भरण मजबूत करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसुरक्षा बळकट करण्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी शासनाकडून पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
०००
