
मुंबई, दि.३: हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवन येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शी, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस चे मुख्य एकात्मिक पुरवठा साखळी अधिकारी अविनाश कांत कुमार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सक्षम स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावणाऱ्या उद्योगांचे महाराष्ट्र नेहमीच स्वागत करतो.
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील तीन उत्पादन केंद्रांद्वारे हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने राज्यातील विशेषतः दुर्गम तालुक्यांमध्ये रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे. तसेच स्थानिक पुरवठा साखळी अधिक सक्षम करताना विविध सामाजिक विकास उपक्रमांद्वारे राज्यातील सुमारे ४६ लाख नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ
