Pune | Tue, 17 March 2026

Ad

जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट

Sunil Goyal | 10 views
जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट

मुंबई, दि.२३ : जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत  एरिक अफ् हॉलस्ट्रॉर्म व चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत कीन जी यांनी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

जपानच्या नव्या पंतप्रधान ताकाईची सनाए भारताशी घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत आग्रही असून उभय देश राज्यस्तरावर देखील सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी राज्यपालांना सांगितले. टोयोटा – किर्लोस्कर कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जपानने महाराष्ट्राला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, अटल सेतू व मेट्रो लाईन ३ साठी सहकार्य केले असल्याचे सांगून राज्यात जपानच्या ८०० उद्योग संस्था कार्यरत असल्याचे जपानच्या वाणिज्य दूतांनी राज्यपालांना सांगितले.

फिनलँडचे अध्यक्ष मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार असून ते मुंबईला देखील भेट देणार असल्याचे फिनलँडचे वाणिज्यदूत एरिक अफ हॉलस्ट्रॉर्म यांनी राज्यपालांना सांगितले.

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत क्विन जी यांनी देखील राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन उभय देशांमधील व्यापार, शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

बैठकींना राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व सहसचिव एस राममूर्ती उपस्थित होते.

००००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp