Pune | Tue, 17 March 2026

Ad

जवाहर बालभवन बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Sunil Goyal | 9 views
जवाहर बालभवन बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन हे केवळ शैक्षणिक किंवा सांस्कृतिक केंद्र नसून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे प्रेरणादायी व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा बालभवनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दादा भुसे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा ७४ वा वर्धापन दिन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाला. त्यानिमित्त ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विभागीय शिक्षण उपसंचालक श्री कंकाळ, बालभवनचे अशासकीय सदस्य प्रशांत भामरे, बालभवनच्या संचालिका निता पाटील आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ फेब्रुवारी १९५२ रोजी बालभवनाच्या इमारतीचे उदघाटन केले. या बालभवनाला आता ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. जवाहर बालभवनमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक, विज्ञान, योग तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना चालना दिली जाते. येथे केवळ कला शिक्षणापुरते मर्यादित न राहता जीवनमूल्ये, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणांचीही जोपासना केली जाते, असे प्रशंसोद्गार शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी काढले.

बालभवन च्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, यामधून बालमित्रांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. बालभवन इमारतीचे नूतनीकरण प्रगतीपथावर असून, लवकरच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी इमारत बालमित्रांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध राज्यांमधील नृत्यकलांचे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी यावेळी कौतुक केले.

विद्यार्थी आणि पालकांच्या योगदानातून बालभवनचे कार्य अधिकाधिक उत्तम होत आहे. बालभवनची नवीन वास्तू आता आकार घेत आहे. ही नवी वास्तू नवतंत्रज्ञानाने सुसज्ज अशी राहणार असून त्यामध्ये वातानुकुलीत ई-लॅब, भव्य प्रेक्षागृह आदी सर्वच सुविधा राहणार असल्याचे बालभवनच्या संचालिका निता पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.

वर्धापन दिनानिमित्त निबंध लेखन, काव्यलेखन, चित्रकला, रंगभरण, गायन व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.

०००

धोंडिराम अर्जुन/स.सं

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp