
चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांनासुध्दा मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मागे शासन भक्कमपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

चांदा क्लब येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करताना पालकमंत्री डॉ. वुईके बोलत होते.
यावेळी मंचावर चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, गिरीश धायगुडे, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर चंद्रशेखर शेट्टी आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनीमध्ये 325 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे सादरीकरण सर्वत्र पोहोचावे. चंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटाचे काम मोठे आहे. कृषी विषयक योजनांचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे. 13 मार्च 2026 रोजी किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वाटप करण्यात आला. यात जिल्ह्यातील 2 लक्ष 46 हजार 307 शेतकऱ्यांच्या खात्यात 49 कोटी 26 लाख रुपये जमा झाले आहे. कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. ग्रामीण महिला बचत गटासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण केंद्र आणि इमारत बांधण्याकरिता निधी देण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते फीत कापून कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली.
खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, शेतीमध्ये आगळावेगळा प्रयोग करणे अत्यंत गरजेचे झाले असून केंद्र व राज्याच्या अनेक कृषी विषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहचवाव्यात. बचत गटाच्या उत्पादनासाठी तालुका स्तरावर विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महापौर संगिता खांडेकर यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार शिवकुमार पुजारी यांनी मानले.
कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज : आमदार किशोर जोरगेवार
कृषी आणि संलग्न व्यवसायातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूरकडे विशेष लक्ष असून बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहे. उमेदच्या माध्यमातून लखपती दीदी तयार होत आहे. महिलांना डिजिटल साक्षर होण्याची गरज आहे. बांबूक्षेत्रातही शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. चंद्रपूरला पर्यटनाच्या क्षेत्रातून विकसित करावे. ऍग्रो टुरिझमलाही जिल्ह्यामध्ये चांगली संधी आहे. आज शेतीचा पॅटर्न बदलला असून कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज आहे, असे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
कृषी आणि पशु प्रदर्शनाचे चांगले नियेाजन : आमदार देवराव भोंगळे
जिल्हास्तरीय कृषी महोत्सव हा चंद्रपूरकरांसाठी एक पर्वणी असते. या माध्यमातून जनतेपर्यंत कृषी विषयक व संलग्न योजनांचा प्रचार प्रसार होतो. आज येथे कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. पशुंच्या प्रजाती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. जिल्हास्तरीय पाच दिवसांच्या कृषी प्रदर्शनीचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

समुदाय निधी धनादेश वाटप : 1) मध संकलन केंद्राकरिता लक्ष्मी प्रभाग संघ यांना 50 लक्ष रुपयांचा धनादेश, 2) आजीविका ग्रामीण वाहतूक करिता सक्षम प्रभाग संघ यांना 51 लक्षाचा धनादेश, 3) समूह गुंतवणूक निधी करिता क्षितिज प्रभाग संघ यांना 1 कोटीचा धनादेश, 4) समूह गुंतवणूक निधी म्हणून नारीशक्ती प्रभाग संघ यांना 1 कोटीचा धनादेश, 5) एकात्मिक शेती करिता मातोश्री प्रभाग संघ यांना 30 लक्ष रुपयांचा रुपये धनादेश, 6) समूह गुंतवणूक निधी अंतर्गत अस्मिता प्रभाग संघ यांना 54 लक्षाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृषी महोत्सवाचे प्रमुख्य वैशिष्ट्ये : 1) शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजना / उपक्रमांची माहिती 2) महिला स्वयंसहायता गटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री 3) कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती 4) अनुभवी आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन 5) कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत विविध खाजगी कंपन्यांची अद्यावत तंत्रज्ञानाची कृषी औजारे 6) सूक्ष्म सिंचन – ठिबक / तुषार संचांची प्रात्यक्षिके 7) उत्पादक ते ग्राहक थेट विक्री
००००
