Pune | Tue, 17 March 2026

Ad

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Sunil Goyal | 8 views
कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणी, दि. ०२ (जिमाका) : कामगार भवनच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील. या भवनामुळे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांचे वितरण, आरोग्य सेवा, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर कल्याणकारी कार्यक्रम अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबविता येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी शहरात आज कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कामगार आयुक्त एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, उपविभागीय अभियंता बी.एम. शिंदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या की, कामगार भवनाची नवी इमारत ही परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. कामगारांच्या कुटूंबांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहाय्य केले जाते.  कामगारांचे  जीवनमान उंचविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यात कामगार भवन उभारले जात आहे.  कामगार विभागाची नवीन इमारत पूर्ण झाल्यावर कामगार वर्गासाठी सुसज्ज कार्यालय उभारले जाईल आणि या कार्यालयातून कामगारांना उत्तम सेवा मिळतील आणि या विभागाचे काम अधिक गतिमान व सुलभ होईल.

कामगार भवनाकरीता एकूण 0.11 गुंठे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून 14 कोटी 58 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ही इमारत तीन मजली असणार आहे. यामध्ये अंतर्गत फर्निचर, बागबगीचा, संरक्षण भिंत, अग्निरोधक यंत्रना, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण व अनुषांगिक बाबी राहणार आहेत.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp