
शेतकरी हा भारतीय समाजातील अर्थकारणाचा मुख्य कणा आहे. याचा पाया मजबूत करण्यासाठी शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीची गरज असते. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. ती शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आली आहे. ‘कर्जमुक्ती’ ही फक्त कागदावरील आकडेमोड नसून, ती शेतकऱ्याच्या मनावर फुंकर घालणारी योजना आहे.
अलीकडेच शेतीला व्यवसाय म्हणण्याची प्रथा सुरू झाली. या व्यवसायात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी लागते. यातील कोणतंही काम ठरवून अगदी वेळेनुसार करूनही फायदा होईल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही, अगदी हवामान खातं सुद्धा.
शेतीचा व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतो. शेतकरी सतत निसर्गाबरोबर झुंजत राहतो. तो काळ्या आईची सेवा करतो वर्षानुवर्षं…. अती पाऊस, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाचं अक्राळ विक्राळ रूप, गारपिटीचे जीवघेणे तडाखे, बाजारभावाच्या दरातील चढउतार, डोक्यावरचा कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांच्या मुलांची न होणारी लग्नं, भविष्याची सततची चिंता अशा सगळ्या चक्रव्यूहात शेतकरी अडकलेला असतो. त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या खचतो. मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. काहीजण आत्महत्या करतात.
अशा परिस्थितीत घरातील महिला शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभी असते. ती स्वतः महिला शेतकरी म्हणून काळ्या मातीत वाघिणीसारखी पाय रोवून उभी राहते. ती कधी स्वतंत्रपणे तर कधी घरधन्याबरोबर शेती करत असते. निसर्गाच्या साथीची मात्र तिला गरज असते. मानसिक आधाराची गरज असते. हा आधार म्हणजे फक्त ‘ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ‘ असा नको आहे. काहीतरी ठोस असा कृतिशील उपाय हवा. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन समस्या समाधान शोधणं गरजेचे असते.
हा सगळा विचार करता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ शेतकऱ्याला मानसिक आधार देईल. आर्थिक मदत करेल. नैराश्यातून बाहेर काढेल. त्याच्यासाठी ही योजना ‘संजीवनी’ ठरेल यात शंकाच नाही. ही योजना महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक संग्रहातील एक महत्त्वाचा दागिना ठरेल. त्या सोनेरी पहाट बघतील आणि कष्टाची नांगरही ओढतील. या निर्णयाने त्यांच्या आयुष्यात बरेच बदल होतील.
कर्जाचा बोजा आणि मानसिक ताण
निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकरी खचतो. गरजेनुसार त्याला कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा बोजा वाढत जातो. दरवर्षी चांगल्या पिकाच्या अपेक्षेने रात्रंदिवस कष्ट करतो. तरीही जेव्हा नुकसान होतं तेव्हा कर्जाचे हप्ते थकतात. बँकेच्या नोटिसा येत राहतात, तेव्हा आगतिकतेची भावना निर्माण होते. भविष्याविषयीची अनामिक भीती जाणवत राहते. असुरक्षितता मनात घर करते. अनेक अस्वस्थ रात्री त्याच्या अनुभवात ठाण मांडून बसतात. आत्मसन्मानाला तडा जाण्याच्या भीतीने झोप उडते. चिडचिड वाढते. कौटुंबिक सौख्याला ग्रहण लागते. सामाजिक प्रतिष्ठा पणास लागते. सावकारांचा तगादा प्रचंड ताण देतात. समाजात पत जाण्याची भीती यामुळे मन पोखरले जाते. अशा वेळी ‘कर्जमुक्ती’ ही फक्त कागदावरील आकडेमोड राहत नाही. ती शेतकऱ्याच्या मनावरचा ताण कमी करते.
नवी सुरुवात
कर्जमुक्तीमुळे शेतीच्या आणि महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. शेतकरी स्वतःचं तसेच शेतीचं पुनरुज्जीवन करतील. कर्जमुक्तीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनातील साचलेपण दूर होईल. महिला शेतकऱ्यांचं मन आनंदानं हिरवंगार होईल. त्यांच्यात आशेचा किरण निर्माण होईल. उर्जेचा नवा झरा वाहू लागेल. थकित कर्जाचा कलंक पुसला जाईल. त्यामुळे बँकांचे दरवाजे त्यांच्यासाठी पुन्हा सन्मानाने उघडतील. पुढील हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि “नव्याने सुरुवात करण्याची” जिद्द निर्माण होईल. हा नवा बदल ‘आता मी पुन्हा उभा राहू शकतो’ असा आत्मविश्वास देणारा आहे.
प्रामाणिकपणाचा सन्मान
नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी असणारी ही प्रोत्साहनपर तरतूद आहे. जेव्हा प्रामाणिकपणे घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाची दखल शासन घेते तेव्हा त्याच्या मनात व्यवस्थेबद्दल कृतज्ञता निर्माण होते. स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल सार्थ अभिमान निर्माण होतो. ही भावना ग्रामीण भागात एका निरोगी आर्थिक संस्कृतीला जन्म देणारी ठरेल.
शाश्वत प्रगतीची पंचसूत्री
कर्जमाफी हा तात्कालिक संकटावरचा अत्यंत प्रभावी उपाय असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि जीवनमान कायमस्वरूपी सुधारता येऊ शकते. या योजनेला एका व्यापक संरक्षणाची जोड देणे गरजेचे आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ आवर्जून सांगतात.
यासाठी खालील बाबींवर भर देणे आवश्यक आहे:
१) पीक विम्याचे अभेद्य कवच: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्याला आधार देणारी विमा योजना महत्त्वाची असते.
२) स्थिर बाजारभावाची हमी: घामाचा दाम वेळेवर मिळण्याची व्यवस्था असावी.
३) आधुनिक शेतीचा सल्ला : हवामान बदलानुसार शेती करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात यावे.
४) उत्पन्नाचे बहुविध स्रोत : पशुपालन, कुक्कुटपालन इ. शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन व त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
५) मानसिक समुपदेशन केंद्र : ग्रामीण भागात मानसिक तणावावर मोकळेपणाने बोलण्यासाठी, उपचार मिळण्यासाठी समुपदेशन केंद्रांचे जाळे तयार व्हावेत.
एकूणच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील शेती आणि महिला शेतकरी यांच्यासाठी भावनिक – मानसिक आधार असेल. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि कृषी क्षेत्रात आधुनिकता आणणे हा आहे. हा उद्देश तेव्हाच सफल होईल, जेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यांत नव्या स्वप्नांचे अंकुर फुटतील. शेतकरी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या उमेदीने, ताठ कण्याने शेतकरी उभा राहील. त्यातच या योजनेचे खरे यश आहे.
अर्चना मुळे, समुपदेशक, सांगली
00000
