Pune | Thu, 14 May 2026

Ad

लोकसहभागातून आरोग्य समृद्धीकडे आरोग्य विभागाची वाटचाल

Sunil Goyal | 2 views
लोकसहभागातून आरोग्य समृद्धीकडे आरोग्य विभागाची वाटचाल

मुंबई, दि. १४ :  राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजात अधिक समन्वय, गुणवत्ता सुधारणा आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे वतीने राज्यातील सर्वसामान्य नागरिकाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमआरआय, सिटी स्कॅन, डायलेसिस, स्टेमी प्रकल्प, टेलिमेडिसीन  यासह अनेक दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आरोग्यसेवा लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘माझ गाव आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्वपूर्ण अभियान सुरू आहे. त्याच महत्वकांक्षेने  आरोग्य विभागाचे  उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी आरोग्य विभागाने विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत ग्रामीण व शहरी भागात आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये, सामान्य रुग्णालये, प्रादेशिक मनोरुग्णालये तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांसारख्या आरोग्य संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून, त्यांचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी नवीन समिती रचना लागू करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार, ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर स्वतंत्र ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ गठित करण्यात येणार आहे. ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील समितीचे अध्यक्ष संबंधित आमदार असतील, तर तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीत खासदार, विधान परिषद सदस्य निमंत्रित  सदस्य असतील, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.

महानगरपालिका क्षेत्रातील समित्यांमध्ये संबंधित आमदार अध्यक्ष असून, महापौर, उपमहापौर, आरोग्य समिति सभापती,  खासदार व  विधान परिषद सदस्य निमंत्रित  सदस्य असतील, तसेच महानगरपालिका सदस्य, शिक्षण व महिला-बाल विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

जिल्हा स्तरावरील समितीचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर सहपालकमंत्री सह-अध्यक्ष म्हणून काम पाहतील. समितीत खासदार, विधान परिषद आमदार, महापौर, उपमहापौर, आरोग्य समिती सभापती,   निमंत्रित  सदस्य असतील, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष,  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश असेल.

राज्यस्तरीय ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’चे अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असतील, तर राज्यमंत्री सह-अध्यक्ष राहतील. समितीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी आणि शहरी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून सहभागी राहतील.

या समित्यांचे प्रमुख कार्य म्हणजे आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता सुधारणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, नागरिकांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करणे, विविध विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे आणि समुदाय सहभाग वाढविणे हे राहणार आहे. तसेच जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती, महिला आरोग्य समिती आणि ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.सर्व गावे व आरोग्य संस्थासाठी कार्यरत असलेल्या या  समिती सदस्यांच्या शिफारसीवर विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याचे काम“एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती करेल.

शासन निर्णयानुसार प्रत्येक समितीची दर तीन महिन्यांनी किमान एक बैठक घेणे बंधनकारक असून,  समितीच्या बैठकीतील निर्णयांवर संबंधित अधिकाऱ्यांनी निश्चित कालावधीत कार्यवाही करून अनुपालन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. विधानसभा स्तरावरील समित्यांच्या कामकाजाचा आढावा जिल्हास्तर समिती घेणार असून, जिल्हास्तर समित्यांच्या कामाचा आढावा राज्यस्तरीय समितीमध्ये स्वत सार्वजनिक आरोग्य मंत्री यांचेकडून घेतला जाणार  आहे.

या निर्णयामुळे राज्यातील आरोग्य सेवांमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होऊन आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.

000

दतात्रय कोकरे /विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp