
मुंबई, दि. १४ : आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि समन्वयित करण्याच्या उद्देशाने मान्सून काळातील पूर, शहरी पूरस्थिती, दरडी कोसळणे, धरण व्यवस्थापन, स्थलांतर नियोजन, पूर्वसूचना प्रणाली, संसाधनांचे व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीद्वारे महाराष्ट्रातील यंत्रणा सुसज्ज करण्यात येत असल्याची माहिती राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राने दिली आहे.
‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था’ (एनआयडीएम), महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यांच्यातर्फे संयुक्तरित्या ‘महाराष्ट्रातील मान्सूनपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. यामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत संपर्क व्यवस्था मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. संदेशवहन तंत्रज्ञान (सीएपी) आधारित सूचना, सचेत प्रणाली, लघु संदेश अलर्ट आणि आधुनिक पूर्वसूचना तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यातील जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महसूल, सिंचन, नगर विकास, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, अग्निशमन सेवा, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) जवान तसेच महानगरपालिका, स्थानिक संस्थांमधील अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले.
महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि केंद्र सरकारच्या एनआयडीएमचे कार्यकारी संचालक मधुप व्यास यांनी यशदाचे महासंचालक सुहास दिवसे यांच्या सहाय्याने नियोजन केले. एसडीएमएचे संचालक भालचंद्र चव्हाण यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांसह विविध तांत्रिक संस्थांतील तज्ज्ञांनी सहभागी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तांत्रिक सादरीकरणे, गटचर्चा, स्थळभेटी तसेच २००५ मुंबई पूर आणि २०१९ व २०२१ मधील कोकण पूरस्थितीवर आधारित टेबलटॉप सिम्युलेशन्सद्वारे प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कौशल्यांचा आढावा घेण्यात आला.
राज्यात वाढते शहरीकरण, हवामान बदल आणि पूरप्रवण क्षेत्रांतील वाढती जोखीम लक्षात घेता, मान्सूनपूर्व तयारी अधिक प्रभावी करून आपत्ती जोखीम कमी करणे आणि समन्वित प्रतिसाद यंत्रणा मजबूत करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महाराष्ट्रातील बदलत्या पावसाच्या पद्धती आणि पूरधोक्याबद्दल जनतेत आणि संबंधित घटकांमध्ये समज वाढवणे, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय निरीक्षण/नोंदी यांचा वापर करून पूर्वसूचना प्रणाली आणि अचूक पूराचे इशारे देणे, राज्यातील अगदी शेवटच्या (प्रत्येक) व्यक्तिपर्यंत वेळेत इशारे पोहोचवणे आणि परिणामावर आधारित अंदाज देणे, विविध विभागांमधील समन्वय आणि घटना प्रतिसाद प्रणाली (आयआरएस) अधिक प्रभावीपणे राबविणे, प्रभावी स्थलांतर नियोजन आणि निवारा व्यवस्थापन करणे, एनडीएमए आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमांनुसार आपत्तींची त्वरित माहिती नोंदवणे या मुद्यांवर प्रशिक्षणात भर देण्यात आला. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राने केंद्र व राज्याच्या विविध यंत्रणाच्या सहकार्याने विकसित केलेल्या गाव पातळीपर्यंतच्या आपत्ती बाबत माहिती देणारी प्रणाली/डॅशबोर्डचे स्थानिकीकरण व वापर अति वृष्टी परिस्थितीवरील टेबलटॉप सिम्युलेशन्सद्वारे प्रात्यक्षिक प्रशिक्षणातून आपत्ती पूर्वतयारी, समन्वय आणि स्थानिक पातळीवरील क्षमता वृद्धीसाठी कार्यवाही केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000
किरण वाघ/विसंअ
