Pune | Thu, 14 May 2026

Ad

मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा – मनशक्ती मुख्य अभ्यासक्रम समन्वयक मयूर चंदने

Sunil Goyal | 5 views
मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा – मनशक्ती मुख्य अभ्यासक्रम समन्वयक मयूर चंदने

 मुंबई, दि. ४ : मानवाने कोणतीही संधी नाकारण्यापेक्षा ती स्वीकारून स्वतःचा विकास साधावा. ‘जस्ट डू इट’ आणि ‘ट्रेन युअर माईंड अँड चेंज युअर ब्रेन’ हे मंत्र आत्मसात करावे. मनाचे नियोजन करा आणि मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा, असे मनशक्तीचे मुख्य अभ्यासक्रम समन्वयक मयूर चंदने यांनी सांगितले

मंत्रालयात टेक-वारी २.० या सप्ताह अंतर्गत ‘ऑप्टिमायजिंग दि ब्रेन कॅपॅसिटीस’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य अभ्यासक्रम समन्वयक मयूर चंदने म्हणाले, कोणतेही काम कठीण वाटले किंवा हे माझे काम नाही असे म्हणत टाळाटाळ केल्यास आपण नव्या संधी गमावतो. यामुळे मेंदूला नव्या गोष्टी शिकण्याची आणि नवीन न्यूरॉन्स सक्रिय होण्याची संधी मिळत नाही. चित्र काढणे, बोलणे, कथा किंवा कविता लिहिणे अशा कोणत्याही कृतीसमोर भीती न बाळगता पुढे जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

मानवी मेंदूचे वजन साधारणपणे १३५० ग्राम असते. मानव प्रचंड क्षमता घेऊन जन्माला आला आहे. आपण ज्या पॅटर्नमध्ये असतो तो पॅटर्न मोडू शकतो. मानवी मेंदू हा उजव्या आणि डाव्या भागांमध्ये विभागला आहे. दोन्ही मेंदू मधला संवाद होणे अपेक्षित आहे. वापरा नाही तर संपुष्टात येईल ही संकल्पना स्पष्ट करताना चंदने यांनी अनेक उदाहरणे आणि प्रात्यक्षिके देत मानवी मेंदूचे कार्य सांगितले.

प्रत्येक आव्हानाला ‘जस्ट डू इट’ या भावनेने सामोरे गेल्यास मेंदूचा विकास होऊन व्यक्तीचे कल्याण साध्य होऊ शकते. सकारात्मक विचार आणि कृतीशीलता अंगीकारण्याचे आवाहन चंदने यांनी यावेळी केले.

 

 

 

 

००००

गजानन पाटील/स.सं

 

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp