Pune | Thu, 14 May 2026

Ad

महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एआयचा वापर करा – मंत्री आशिष शेलार

Sunil Goyal | 4 views
महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एआयचा वापर करा – मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. ६ : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शून्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निविदेतील व्हेरिएशनवर लक्ष राहिल, कामाची अंमलबजावणी प्रभावी होईल, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

राज्याच्या कृत्रिम बुध्दीमत्ता धोरणाला राज्यमंत्री मंडळाने मंजुरी दिली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाने काम करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री ॲड. शेलार यांनी मुंबई महापालिका आणि इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, महाआयटीचे संचालक संजय काटकर, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक भुवनेश्वरी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महापालिका दैनंदिन कामकाजात एआयचा वापर कशा पद्धतीने होत आहे याबाबतचे सादरीकरण महापालिकेतर्फे करण्यात आले. नालेसफाईमध्ये पारदर्शकता यावी  तसेच नागरी सेवांमध्ये पारदर्शक व गतीमानता यावी यासाठी एआयचा वापर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारी चॅटबॉट या एआय तंत्रज्ञानामार्फत विभाग कार्यालयात संकलित करण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले. मात्र यामध्ये एआयचा वापर करुन अधिकची सुधारणा करावी व कोणत्याही महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तक्रार त्याने बोलल्यानंतर तो व्हिडीओ रेकॉर्ड होऊन तो व्हिडीओ संबंधित विभागाकडे जाईल व त्यावर तातडीने कारवाई अथवा कार्यवाही होईल, अशा पध्दतीने नियोजन करण्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मंत्रालयात ई फाईल व ई-स्वाक्षरी ची संकल्पना प्रभावीपणे राबवली आहे, त्याच पद्धतीने मुंबई महापालिकेत ही संकल्पना राबविण्यात यावी आणि पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने कामकाज होईल याचे नियोजन करावे. निविदा पद्धतीमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक असून महापालिकेच्या निविदेमध्ये अनेक वेळा व्हेरिएशन केले जाते त्यावर एआय नियंत्रण आणावे, जेणेकरून नागरिकांना अशा पद्धतीने झालेल्या कामांची माहिती मिळू शकेल. तसेच व्हेरिएशनमध्ये करण्यात आलेला निर्णय योग्य आहे की नाही हे एआय मार्फत स्पष्ट होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या  सूचना पालकमंत्री ॲड .शेलार यांनी दिल्या.

दरम्यान, महापालिकेच्या कामकाजात नागरिक सहभागीता वाढावी व तरुणांच्या नवनवीन कल्पना समजून त्याचा वापर प्रशासनामध्ये करता यावा, यासाठी तरुणांची हे हँकेथॉन आयोजित करा, असेही मंत्री आशिष शेलार यांनी सूचित केले.

000

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp