Pune | Tue, 17 March 2026

Ad

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत

Sunil Goyal | 10 views
महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठीची लेखी परीक्षा आज रविवारी राज्यातील १११ परीक्षा केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. एकूण १३४ रिक्त पदांसाठी आयोजित या परीक्षेस २३ हजार ३३६ अर्जदारांपैकी तब्बल १५ हजार ५४१ उमेदवारांनी हजेरी लावली.

ही परीक्षा सकाळी ९ ते ११ या वेळेत घेण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अमरावती, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, चंद्रपूर आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली. सर्व केंद्रांवर आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रवेशपत्र व ओळखपत्रांची काटेकोर तपासणी, सीसीटीव्हीद्वारे देखरेख, व्हिडिओग्राफी तसेच कडक सुरक्षा व्यवस्था यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी विशेष दक्षता घेतली.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी परीक्षेचे काटेकोर नियोजन केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय आढावा घेत परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली.

परीक्षेदरम्यान केंद्राच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत जमावबंदी लागू करण्यात आली होती. परीक्षा केंद्रात विनापरवानगी प्रवेश, तसेच उमेदवारांना कोणतेही लिखित साहित्य किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण बाळगण्यास सक्त मनाई होती. पोलिस बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित असूनही महापारेषणच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण राज्यात परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती महापारेषणतर्फे देण्यात आली.

000

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp