Pune | Thu, 14 May 2026

Ad

महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा

Sunil Goyal | 16 views
महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा

मुंबई, दि. १ : बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव – तुकाराम’ गजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला.  राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपालांचे स्वागत बाल वारकऱ्यांच्या दिंडीने व नामगजरात करण्यात आले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांअंतर्गत शुक्रवारी (दि. 1 मे) महाराष्ट्र राज्य स्थापनेसह गुजरात राज्य स्थापना दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देश म्हणजे केवळ भौगोलिक सीमांनी वेढलेले क्षेत्र नसून देश हा विविध संस्कृतींचा सुंदर समूह असतो. एखाद्या राज्याला समजून घ्यायचे असेल तर तेथील संस्कृती समजून घेतली पाहिजे, असे यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितले.  प्रत्येक राज्याची संस्कृती भिन्न असली तरीही त्यांमध्ये एकात्मतेचा धागा जुळलेला आहे असे त्यांनी नमूद केले.

अमरवाणी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्लेकर, गायिका उपग्ना पंड्या व कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी सुंदर मराठी व गुजराती लोकगीते व भक्तिगीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संतांचे कार्य ही समतेची चळवळ असते असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी जाहीर केले.

राज्यपालांच्या हस्ते पद्मभूषण उदय कोटक, उद्योजक पद्मश्री अशोक खडे, कलाकार  पद्मश्री  भिकल्या धिंडा, पद्मश्री जुझर वसी, कलाकार पद्मश्री आर माधवन, दिवंगत अभिनेते पद्मश्री सतीश शहा, पद्मश्री सत्यनारायण नुवाल आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात ‘सूर निरागस हो’, गुजराती लोकगीत, ‘वैष्णव जन तो’ व तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करण्यात आला. बाल वारकरी मुलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले.

राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले, तर राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला अमरवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मदन महाराज गोसावी, उद्योजक निखिल मर्चंट, आयुक्त मत्स्य विकास प्रेरणा देशभ्रतार, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, राज्यपालांचे  परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp