Pune | Thu, 14 May 2026

Ad

महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल; ‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम

Sunil Goyal | 11 views
महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल; ‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम

नवी दिल्ली,९: केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या यशाच्या पाऊलखुणा उमटवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि  बालस्नेही या दोन महत्त्वाच्या गटांमध्ये  देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्कारांचे वितरण ३ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष सोहळ्यात  होणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ (Child-Friendly Panchayat) श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. ही कामगिरी राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव देशासाठी आदर्श ठरले आहे. त्याचप्रमाणे, रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ (Water-Sufficient Panchayat) श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.

प्रथम क्रमांकासोबतच राज्याने द्वितीय श्रेणीतील पुरस्कारांवरही आपले वर्चस्व राखले आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासनासाठी ‘सुशासन’ श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ या विषयात देशात द्वितीय स्थान मिळवत ३७.५ लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे.

हे पुरस्कार ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ (DDUPSVP) आणि ‘नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ (NDSPSVP) अशा दोन प्रमुख श्रेणींमध्ये दिले जातात. गरिबी निर्मूलन, आरोग्य, सुशासन आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या ९ प्रमुख संकल्पनांवर आधारित कामगिरीचे मूल्यमापन ‘पंचायत प्रगती निर्देशांक’ (PAI 2.0) नुसार करण्यात आले आहे.

********

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्तविशेष-112/ दि.09.05.2026

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp