Pune | Thu, 14 May 2026

Ad

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून नांदेडमध्ये ग्रामस्तरापर्यंत सर्वंकष आरोग्य सेवेचा आराखडा 

Sunil Goyal | 1 views
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून नांदेडमध्ये ग्रामस्तरापर्यंत सर्वंकष आरोग्य सेवेचा आराखडा 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वानंद सोनार यांच्याद्वारे संकल्पना विषद

नांदेड दि. १४ : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकारातून निरामय नंदीग्राम (नांदेड) या व्यापक आरोग्य अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाच्या प्राथमिक नियोजन बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वानंद अरुण सोनार यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते.

या बैठकीत शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीयकृत व खासगी बँका, CSR दाते उद्योगसमूह, सेवाभावी संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून व्यापक यंत्रणा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी (वर्ग-१) डॉ. स्वानंद सोनार यांनी बैठकीत बोलताना, “आरोग्य सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण व तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन, सामाजिक संस्था, CSR दाते, सार्वजनिक बँका आणि खासगी रुग्णालयांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.

या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत रिठ्ठे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माहिती तंत्रज्ञान समन्वयक युवराज महाजन, डॉ. चंद्रकांत मुंडे, वैद्यकीय अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, समन्वयक संभाजी लोंढे आणि महसूल सहाय्यक नारायण वाडेकर आदी उपस्थित होते.

विविध बँका, उद्योगसमूह आणि रुग्णालयांचा सहभाग

बैठकीस स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, इंडियन बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, UCO बँक आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय गोदावरी ड्रग्स, वेंकीज इंडिया प्रा. लि. तसेच MIDC नांदेडमधील विविध उद्योगसमूह आणि उद्योजक तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्न नांदेड जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, डॉक्टर्स आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘PPP मॉडेल’द्वारे आरोग्य उपक्रमांची अंमलबजावणी

बैठकीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या विविध आरोग्य उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. गेल्या चौदा महिन्यांत “चरणसेवा”, “नमो नेत्र संजीवनी”, “आरोग्याचा श्री गणेशा”, “एक हात मदतीचा” आणि “हिंद-दी-चादर” यांसारख्या विविध आरोग्य मोहिमा आणि समुदाय आरोग्य शिबिराची एकंदरीत कार्यप्रणाली, लाभार्थी रुग्णसंख्या व लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या निधी बाबत इत्यंभूत माहिती उपस्थितांना देण्यात आली.

या शिबिरांत संदर्भित रुग्णांना द्वितीय तथा तृतीयस्तरीय चिकित्सा सेवाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरघोस मदत उपलब्ध करून देण्यात आलेली असून प्राथमिक सर्वेक्षण, प्रारंभिक तपासणी व औषोधोपचार व निदानात्मक सेवांकरीता मात्र शासनाचा कोणताही थेट निधी न वापरता सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP मॉडेल) करण्यात आला व हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. या मोहिमांमुळे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत, शस्त्रक्रिया, तपासण्या, मोफत औषधोपचार आणि उपचारासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध झाले आहे.

नांदेडमधील वाढत्या आरोग्य समस्यांवर चिंता

बैठकीत नांदेड जिल्ह्यात महिलांमधील कर्करोग, ॲनिमिया, असंसर्गजन्य आजार (NCD), दूषित पाण्यामुळे होणारे आजार, त्वचारोग, COPD आणि व्यवसायजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना व अपेक्षित उपचारात्मक सुविधा यावर विचार मंथन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर ग्रामपातळीवर व्यापक आरोग्य सर्वेक्षण, निदानात्मक आरोग्य शिबिरे, कर्करोग तपासणी मोहिमा, महिला आरोग्य जनजागृती आणि वेळेवर उपचारासाठी प्रभावी संदर्भ प्रणाली उभारण्यावर भर देण्यात आला.

CSR दाते आणि बँकांना सहकार्याचे आवाहन

बैठकीत उपस्थित CSR दाते, उद्योगसमूह आणि खासगी बँकांना आरोग्यविषयक उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य, वैद्यकीय साहित्य, औषधे आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन यावेळी मांडण्यात आले.

स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बैठकीत विविध सेवाभावी संस्थांनी त्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमांचे सादरीकरण केले. महिलांमधील कर्करोग जनजागृती, महिला संरक्षण, ॲनिमिया नियंत्रण, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, समुदाय आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक शेती जनजागृती आणि ग्रामीण आरोग्य कार्यक्रम राबविण्यासाठी संस्थांनी तयारी दर्शविली.

डॉ. सान्वी जेटवाणी यांनी सिंधी समाज आणि वंचित घटकांसाठी आपत्कालीन कार्डियाक ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. शुभंकरोती फाउंडेशनतर्फे महिलांमध्ये कर्करोग जनजागृती तसेच ग्रामीण भागात Menstrual Hygiene awarenes कार्यक्रम राबविण्याची माहिती देण्यात आली. लायन्स नेत्र रुग्णालयाच्यावतीने मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रक्रियेत पारदर्शकता

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्ण नोंदणी आणि संबंधित अधिकार आता रुग्णालय स्तरावर देण्यात आले असून, पूर्वीपेक्षा अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद कार्यपद्धती लागू करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या प्रणालीमुळे रुग्णांना वेळेत मदत मिळण्यास सहाय्य होणार असून संभाव्य गैरव्यवहार रोखण्यासाठी विशेष नियंत्रण यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अथवा रुग्णांना आवश्यक सेवा वेळेत न देणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

नांदेड पोलिस दलासाठी विशेष व्यापक आरोग्य सर्वेक्षण व चिकित्सा सेवा उपक्रमाची रचना व प्रभावी अंमलबजावणी बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा संयुक्त पुढाकार – नांदेड पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता व्यापक आरोग्य सर्वेक्षण व विशेष सर्वकष चिकित्सा सेवा उपक्रमाची रचना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वानंद सोनार यांच्यात सविस्तर चर्चा झाली, योजना संलग्न खाजगी रुग्णालये व CSR दात्यांच्या आर्थिक पाठबळावर पोलिस कर्मच्यांसाठी जिल्हास्तरीय आरोग्य सर्वेक्षण, समुदेशन, प्राथमिक तपासणी व औषधोपचार तसेच पुढील परिपूर्ण संदर्भित चिकित्सा सेवा उपलब्ध करून देण्याचे संकल्प करण्यात आला, याकामी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व मुख्यमंत्री सहायता कक्षा द्वारे नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

प्रमुख रुग्णालयांना भेटी

बैठकीनंतर नांदेडमधील काही प्रमुख रुग्णालयांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये भगवती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, निर्मल न्युरो केअर हॉस्पिटल, एसएसपी केअर अॅडव्हान्स्ड पेडियाट्रिक सेंटर, आयकॉन हॉस्पिटल, यशोसाई रुग्णालय आणि गुरुकृपा हॉस्पिटल यांचा समावेश होता.

यासोबतच संपूर्णपणे धर्मादाय तत्वावर चालविण्यात येणाऱ्या रयत आरोग्य मंदिर या संस्थेच्या रुग्णालयास देखील डॉ. स्वानंद सोनार व सहकाऱ्यांनी भेट दिली. नांदेड जिल्ह्यात गरीब गरजू रुग्णांना अत्यल्प दरात दर्जेदार चिकित्सा सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या सेवाभावी रुग्णालयाच्या एकंदरीत कामकाजाचे विशेष कौतुक यावेळी डॉक्टरांसोबत यांनी केले व समाजातील इतर सेवाभावी संस्थांनी या रुग्णालयाच्या कार्यप्रणालीचा आदर्श घ्यावा असे सुचविले.

या भेटीदरम्यान रुग्णालयांचे कामकाज, रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा, उपचार पद्धती तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेंतर्गत रुग्णांना योग्य लाभ दिला जात आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने कसे राबविता येईल याबाबत रुग्णालय प्रशासनाला मार्गदर्शन करण्यात आले.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यांत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. स्वानंद सोनार यांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यात निदानात्मक मोफत चाचण्या आणि आवश्यक औषधोपचार करण्यात येणार असून, तिसऱ्या टप्प्यात विविध व्याधीग्रस्त रुग्णांसाठी उपचार यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

“ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासन, सामाजिक संस्था, CSR दाते, उद्योजक आणि वैद्यकीय व शैक्षणिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविता येईल, असे डॉ. स्वानंद सोनार यांनी सांगितले.

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp