
नागपूर,दि. ३० : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पुढे पडता यावे, त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडावे यासाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी आश्रमशाळा यांच्या कार्यपध्दतीत अमुलाग्र बदल केला आहे. शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिक सजग व तंत्रकुशल केले गेले आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून पालकांनी विश्वासाने पुढे येऊन आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
रामटेक तालुक्यातील बेलदा येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आला.
यावेळी आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लिना बन्सोड यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. तर अपर आयुक्त आयुषी सिंह, प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी राहूल काकडे, मुख्याध्यापक तपाने आदी उपस्थित होते.
राज्यातील आश्रमशाळांमध्ये उत्तम आहारासह सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अधिक काळजी घेण्यात आली आहे. या शाळांचे योग्य सनियंत्रण व्हावे यादृष्टीने अपर आयुक्त कार्यालयामध्ये डिजीटल माध्यमातून जोडणी करण्यात आली आहे. यामुळे आवश्यकता असेल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांकडून ऑनलाईन प्रशिक्षणही देण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केल्या. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर आहे. ही जबाबदारी पार पाडतांना शिस्तीसह आनंदी वातावरणाचीही जोड देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आश्रमशाळांसाठी जो वार्षिक नियोजन कृती आराखडा तयार केला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिले. यावेळी विविध उपक्रमांचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यात प्रामुख्याने अमरावती अपर आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या डिजीटल स्टुडिओ, 73 आश्रमशाळेतील विज्ञानकेंद्र, डिजीटल एन्व्हार्यमेंट इन गर्व्हमेंट आश्रमस्कुल उपक्रमांतर्गत 121 आश्रमशाळांकरीता उभारण्यात आलेल्या डिजीटल क्लासरुम व टॅबरुमचा समावेश आहे.
00000
