
मुंबई, दि.16 : मुंबईतील पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व झाडांची सखोल तपासणी करण्याचा पायलट प्रकल्प मुंबईतील आर मध्य आणि एच पश्चिम या भागात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात वृक्षसंवर्धनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार संजय उपाध्याय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई उपनगरांतील प्रत्येक झाडाचे डिजिटल मॅपिंग, आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन करण्याची संपूर्ण प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, यामुळे मुंबई उपनगरातील सर्व झाडांचे वय, प्रजाती, आरोग्यस्थिती, फांद्यांची वाढ, छाटणीची आवश्यकता, तसेच झाडांमुळे होणारे पर्यावरणीय फायदे याची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.
या प्रक्रियेत लाईडर तंत्रज्ञानाद्वारे झाडांचे थ्रीडी इमेजिंग करून त्यांचे अचूक डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येईल. प्रत्येक झाडाचा स्वतंत्र डिजिटल कोड तयार होऊन त्यामध्ये झाडाच्या वाढीची माहिती, कार्बन शोषण क्षमता, प्रदूषण कमी करण्यातील योगदान, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि इतर पर्यावरणीय फायदे नोंदवले जातील.
तसेच झाडांच्या आतील स्थितीची तपासणी करण्यासाठी रेझिस्टोग्राफसारखी आधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत. या उपकरणांच्या साहाय्याने झाड न कापता त्याच्या खोडातील कुजलेला भाग, पोकळी किंवा आतील नुकसान अचूकपणे ओळखता येते. यामुळे झाड सुरक्षित आहे की धोका निर्माण करू शकते, याचा त्वरित निर्णय घेणे शक्य होणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
सध्या मुंबईत झाडांचे सर्वेक्षण प्रामुख्याने मॅन्युअल पद्धतीने केले जात असल्याने अनेकदा झाडांच्या आतील नुकसानाची माहिती मिळत नाही. परिणामी काही वेळा झाडे अचानक पडण्याच्या घटना घडतात. नव्या डिजिटल प्रणालीमुळे अशा घटनांचे विश्लेषण करणे, झाडांच्या पडण्यामागील कारणे शोधणे तसेच झाडांना विष देण्यात आले आहे का याचा तपास करणेही शक्य होणार आहे.
या संपूर्ण प्रणालीअंतर्गत झाडांचा डिजिटल सर्वे, आरोग्य तपासणी, निदान, उपचार आणि दुर्घटनांचे विश्लेषण अशी एकात्मिक व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रारंभी पायलट स्वरूपात आर मध्य आणि एच पश्चिम भागात राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हा विकास निधीतून रक्कम खर्च करण्यात येणार असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ
