Pune | Tue, 30 June 2026

Ad

मुंबईत पीएसएफएस व एएसयूएसई सर्वेक्षणाला प्रारंभ

Sunil Goyal | 1 views
मुंबईत पीएसएफएस व एएसयूएसई सर्वेक्षणाला प्रारंभ

मुंबई, दि. ३०: भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत देशभरात PLFS (Periodic Labour Force Survey) आणि ASUSE (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) हे महत्वाचे सर्वेक्षण राबविण्यात येत असून, राज्यात प्रथमच अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभागामार्फत ही दोन्ही सर्वेक्षण जिल्हानिहाय आकडेवारी मिळविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असल्याचे उपआयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

देश, राज्य आणि जिल्हास्तरावरील विकास नियोजन, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, उद्योजकता प्रोत्साहन तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या सांख्यिकीय माहितीची आवश्यकता असते. शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण धोरणांचे नियोजन आणि मूल्यांकनही या सर्वेक्षणांतून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केले जाणार असल्याने माहितीचा दर्जा गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये माहिती संकलनासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालया अंतर्गत IPSOS Research Private Limited या संस्थेची निवड केली आहे. संस्थेचे अन्वेषक आणि पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबांच्या मुलाखती घेऊन विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. सर्वेक्षणाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे यासाठी अन्वेषक आणि पर्यवेक्षकांना रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्वेक्षणातून संकलित करण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि तिचा वापर केवळ सांख्यिकीय उद्देशासाठीच केला जाईल.

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व नागरिक, लघुउद्योजक, व्यावसायिक तसेच असंघटित क्षेत्रातील घटकांनी सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अन्वेषक आणि पर्यवेक्षकांना अचूक व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. त्यामुळे शासनाचे नियोजन अधिक परिणामकारक व लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असल्याचे उपआयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp