Pune | Thu, 14 May 2026

Ad

पारंपारिक आहारच निरोगी जीवनाचे गमक – प्रा. अन्वेषा बात्रा

Sunil Goyal | 3 views
पारंपारिक आहारच निरोगी जीवनाचे गमक – प्रा. अन्वेषा बात्रा

मुंबई, दि. ६ : बदलत्या जीवनशैलीमुळे खाद्यसंस्कृतीत अनेक नवे ट्रेंड आले असले तरी भारतीय पारंपारिक आहार आणि बनविण्याच्या पद्धतीच खऱ्या अर्थाने पोषक आणि आरोग्यदायी असल्याचे मत इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राध्यापक अन्वेषा बात्रा यांनी व्यक्त केले.

मंत्रालयात ‘टेकवारी २.०’ हा प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य, संगीत आणि आहार यांसारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून ‘फूड फॉर थॉट’ या सत्राचे आयोजन करण्यात आले.

प्रा. बात्रा म्हणाल्या की, ताणतणावपूर्ण जीवनात आरोग्यदायी अन्न साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणे आवश्यक आहे. भरपूर तेल वापरण्यापेक्षा प्रेमाने बनविलेले अन्न अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी असते. भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या भागात पिकणारे अन्न आणि हंगामानुसार उपलब्ध होणारी फळे-भाज्या यांचे सेवन करणे अधिक योग्य ठरते.

त्या पुढे म्हणाल्या की, जिभेची चव आणि पोटाचे आरोग्य यामध्ये समतोल साधणे गरजेचे आहे. योग्य आहार घेतल्यास शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहते. त्यामुळे कामातही सकारात्मकता वाढते.

व्हिटामिन सी, ए, फॉलिक अॅसिड, पाणी, झिंक तसेच फळे, भाज्या, कडधान्ये आणि ड्रायफ्रूट्स यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास वेगळ्या डाएटची गरज भासत नाही. संतुलित आणि योग्य प्रमाणातील आहारातूनच निरोगी शरीर साध्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

या सत्रात शेफ अमोल बलकवडे यांनी घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून आरोग्यदायी रेसिपी तयार करून दाखवल्या. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पदार्थांचा आस्वादही घेतला.

 

 

 

 

 

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp