
मुंबई, दि. १३ : पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे (छत्रपती संभाजीनगर) तसेच भराडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्नियोजन अंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रात सिंचन क्षमता वाढ होणार असल्याने ही कामे कालमर्यादेत पूर्ण केली जावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

विविध सिंचन प्रकल्पातील कामांच्या आढाव्याबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. याप्रसंगी बैठकीस माजी मंत्री अब्दुल सत्तार, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यासह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या योजनेची अंदाजित किंमत ₹534.92 कोटी इतकी असून 4.79 दलघमी पाणीसाठा व 1422 हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये अजिंठा बंधारा (ता. सिल्लोड), खेळणा मध्यम प्रकल्प (उंचीवाढ प्रस्ताव) तसेच पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे या योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला
अजिंठा बंधारा (ता. सिल्लोड) या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत सुमारे ₹250 कोटी इतकी असून प्रकल्पीय पाणीसाठा 7.00 द.ल.घ.मी. आहे. सर्वसाधारण आराखड्यास संकल्पनात्मक मूल्यांकनानंतर मान्यता देण्यात आली असून सर्व्हेनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
खेळणा मध्यम प्रकल्प (ता. सिल्लोड) प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा 12.60 दलघमी असून सिंचन क्षमता 2429 हेक्टर आहे. गाळ साचल्यामुळे घटलेला पाणीसाठा पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने उंचीवाढ करणे कामास तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली.
०००
किरण वाघ/विसंअ
