
मुंबई, दि. १४: राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला आमदार संभाजी पाटील उपस्थित होते तर आमदार अर्जुन खोतकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सहसचिव प्रसाद नार्वेकर, कार्यकारी संचालक जयंत गवळी, कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता अरुण नाईक, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जालना जिल्ह्यातील हातवण येथील बृहत लघु प्रकल्प तसेच दुधना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव उच्च पातळी बंधारा प्रकल्पामुळे वैजापूर व श्रीरामपूर तालुक्यातील एकूण १६ गावांना सिंचनाचा लाभ होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पाचे लाभक्षेत्र १९७८ हेक्टर असून वैजापूर तालुक्यातील देवगाव शनि, गाढे पिंपळगाव, अवलगाव, बाजाठाण, चांदेगाव, भालगाव, हमरापूर, नागमठाण, वांजरगाव तसेच श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर, महाकालवाडगाव, भामाठाण, कमालपूर, घुमनदेव, घांघरगाव आणि डोमेगाव या गावांचा समावेश लाभक्षेत्रात होणार आहे. या प्रकल्पामुळे १९७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे.
मसलगा मध्यम प्रकल्प व हाडगा लघुपाटबंधारे प्रकल्प दुरुस्तीस गती
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प आणि हाडगा लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सुधारित प्रस्ताव ३० जूनपूर्वी सादर करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मसलगा मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १४.६७६ दशलक्ष घनमीटर असून या प्रकल्पांतर्गत १४५० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. प्रकल्पाच्या दुरुस्ती कामासाठी अंदाजे १०३.८४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (एसएलटीएसी) मान्यता देणार असल्याचे सांगण्यात आले.
हाडगा लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या माती धरणाची लांबी १२८८ मीटर असून हा प्रकल्प सन १९७५ मध्ये पूर्ण झाला होता. प्रकल्पाचा एकूण साठा १.४८ दलघमी आहे. धरणाच्या भरावाच्या तळाकडे ५० मीटर लांबीची भेग पडल्याचे तसेच पाया खचल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या धरणाच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून याबाबतचा सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
0000
किरण वाघ/विसंअ
