Pune | Mon, 16 March 2026

Ad

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Sunil Goyal | 5 views
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई दि. १५ : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील U.S. India SME Council, Washington DC तर्फे ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार 14 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला असून त्यांचा सत्कार 25 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन, लखपती दीदी योजना, ग्रामीण महिलांसाठी सिल्क अँड मिल्क उपक्रम, तसेच एकल महिला सशक्तीकरण अभियान यांसारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेत देण्यात आली आहे.

अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेली U.S. India SME Council ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण उद्योजकता वाढविणे तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, शाश्वत विकास, आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी काम करते.

 ०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp