Pune | Wed, 17 June 2026

Ad

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ

Sunil Goyal | 1 views
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार  – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १७ : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ताही उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढीव खाटांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, संचालक पल्लवी सापळे, उपसचिव संदीप ढाकणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत राज्यातील रुग्णालयांमधील वाढता रुग्णभार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांनुसार आवश्यक पदांची उपलब्धता आणि भविष्यातील गरजांवर चर्चा करण्यात आली.राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये दरवर्षी एक कोटीपेक्षा अधिक बाह्यरुग्णांना तसेच 10 लाखांहून अधिक आंतररुग्णांना सेवा दिली जाते. या रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. त्यामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि अध्यापन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अतिरिक्त पदनिर्मितीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि आयपीएचएसच्या निकषांनुसार कार्यरत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. रुग्णांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळावी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

वाढीव सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वित्त विभागाशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव आकृतिबंधाच्या निकषांनुसार अधिक परिष्कृत करून सादर करण्यात येणार आहे. या पदनिर्मितीमुळे डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढेल आणि रुग्णसेवा अधिक परिणामकारक होईल. प्रस्ताव लवकर अंतिम करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची क्षमता वाढविणे, रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp