Pune | Thu, 19 March 2026

Ad

विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य तरुण भारतने अविरत सुरु ठेवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 1 views
विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य तरुण भारतने अविरत सुरु ठेवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १९ : कुठलेही राजकीय पाठबळ व राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, त्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधिष्ठान असते व तेच त्या शतकपूर्तीला कारणीभूत असते. दैनिक तरुण भारतने ती भूमिका अत्यंत उत्तम रितीने पार पाडलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दैनिक तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, तसेच संचालक मंडळाचे सदस्य यावेळी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तरुण भारतने विपरित परिस्थितीतही विचार म्हणून आपले कार्य अविरत सुरु ठेवले आहे. कुठलेही राजकीय पाठबळ आणि राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, यादृष्टीनेही तरुण भारतच्या शतकपूर्तीचे महत्त्व आहे. विचारांचे संवर्धन आणि ते आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम तरुण भारतने सातत्याने व निष्ठेने केले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने तरुण भारत कार्यरत राहिला, त्या उद्देशांची पूर्ती झाली, असे म्हणता येईल. तरुण भारत आता पुण्यातूनही सुरु होत आहे. तेथेही त्यांना उत्तम यश मिळेल, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

तरुण भारतने राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविला- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

तरुण भारतला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, त्याने आपली वैचारिक भूमिका कधीही सोडली नाही. रा.स्व. संघाचा राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम तरुण भारतने सातत्याने केले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. या शतकपूर्तीच्या इतिहासात भाऊसाहेब माडखोलकर यांच्यासह सर्वांचेच अत्यंत मोलाचे योगदान आहे, असेही ते म्हणाले. यावेळी रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या समर्पण या विशेषांकाचे तसेच शताब्दीपूर्तीनिमित्त काढण्यात आलेल्या अविरत या विशेष पुरवणीचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.

तरुण भारतचे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात तरुण भारतच्या शतकपूर्ती वाटचालीचा आढावा घेतला. तर नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे यांनीही तरुण भारतच्या शतकपूर्ती वाटचालीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, राज्यभेच्या खासदार माया इवनाते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे आणि राजाराम वाचनालयाचे सचिव रवींद्र देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली. तरुण भारतच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने जुन्या मुखपृष्ठांच्या फोटोंचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी आयोजित करण्यात आले होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp