Pune | Tue, 17 March 2026

Ad

विधान परिषद लक्षवेधी

Sunil Goyal | 3 views
विधान परिषद लक्षवेधी

अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई अधिक तीव्र करणार; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कारवाई सुरू – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. २८:-  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.  यापुढेही राज्यात अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील मोहीम, कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल असे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी  या विषयीची लक्षवेधी विधान परिषदेत उपस्थित केली.  या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य संजय केणेकर, चित्रा वाघ, अनिल परब, डॉ. मनिषा कायंदे, निरंजन डावखरे, उमाताई  खापरे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

गृह राज्यमंत्री कदम यांनी सांगितले, अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाईसाठी  प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच सदस्यीय विशेष पथके स्थापन केली असून एटीएस व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार, संबंधित व्यक्ती अवैध असल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास दीर्घ न्यायप्रक्रियेविना थेट हद्दपारीची प्रक्रिया राबवता येते. असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले,

बांधकाम साईटवर अवैध मजूर शोधण्यासाठी एसओपी तयार करण्यात आली असून सर्व शासकीय व खासगी प्रकल्पांतील कंत्राटदारांना कामगारांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये कोणत्याही बांधकाम व्यवसायिकाने कुचराई केल्यास गुन्हे दाखल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यात पहिले कायमस्वरूपी डिटेन्शन सेंटर उभारले जात असून यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तसेच शासकीय दस्तऐवज प्रमाणपत्र वितरीत करताना घ्यावयाची दक्षता याबाबत गृह विभागाने सर्वसमावेशक सूचना निर्गमित केल्या आहेत. मुंबई शहरातील सर्व ठिकाणी हॉकर्स, सर्व प्रकारची बांधकाम ठिकाणे, समुद्र काठावरील झोपड्यामध्ये संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, एटीएसच्या पथकामार्फत प्रत्यक्ष शोध सुरू असून बांगलादेशी नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही गृह राज्यमंत्री कदम यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांकडे अवैध बांगलादेशी नागरिक यांच्याविषयी  कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp