Pune | Tue, 17 March 2026

Ad

विकसित महाराष्ट्रासाठी १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Sunil Goyal | 4 views
विकसित महाराष्ट्रासाठी १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेशी सुसंगत राहून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात राज्यातील सर्व क्षेत्रांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत आयआयएम मुंबई कॅम्पसमधील ‘प्रगती विहार एक्झिक्युटिव्ह डायनिंग हॉल’ चे उद्घाटन करण्यात आले.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आयआयएम मुंबईसारख्या संस्थांद्वारे नेतृत्व विकास, संशोधन आणि कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून प्रशासन व उद्योग क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. त्यामुळे विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीत अशा संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

यावेळी ‘आयआयएम’ मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, “मुख्य सचिवांच्या भेटीचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे धोरणनिर्मिती, शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यास आम्हाला बळ मिळेल. भविष्याभिमुख नेतृत्व आणि प्रभावी कार्यकारी शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयआयएम मुंबई कटिबद्ध आहे.

या संवाद कार्यक्रमात संस्थेचे डीन, विभागप्रमुख आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याबरोबरच राज्याच्या विकास व नवोन्मेषाच्या उद्दिष्टांशी उच्च शिक्षण उपक्रमांचे समन्वय साधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

०००

काशीबाई थोरात/वि.सं.अ.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp