Pune | Tue, 23 June 2026

Ad

‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षणातून मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

Sunil Goyal | 3 views
‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षणातून मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

मुंबई, दि. २३ : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. पहिल्या बॅचसाठी अर्जदारांना 29 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हा उपक्रम महत्त्वाची संधी ठरणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच), पुणे ही महाराष्ट्र शासनाची अग्रगण्य संस्था तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, सक्रिय ऐकणे, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर आधारित हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

अधिकृत प्रमाणपत्र

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप

पुणे येथे प्रथम १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, इंटरअॅक्टिव्ह सत्रे, केस स्टडीज, प्रात्यक्षिक उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर एक महिना प्रॅक्टिकल फिल्ड एक्सपोजर (यात जिल्हा पातळीवर एका शाळा महाविद्यालयाला जोडून देण्यात येईल), त्यानंतर ३ ते ५ महिने प्रत्यक्ष व्यवसायासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमार्फत नियमित मॉनिटरिंग, मेंटरिंग, ऑनलाइन सत्र आणि प्रत्यक्ष अडचणीचे निवारण आणि मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष व्यावसायिक सहाय्य असे सर्वसाधारण स्वरूप आहे.

प्रशिक्षण कोण घेणार?

संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे दिले जाईल. त्याचप्रमाणे अमृतमार्फत विविध तज्ञ मार्गदर्शकाचे वेळोवेळी अनुभवाधारित प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे.

प्रशिक्षणानंतर काय?

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच) च्या तज्ज्ञांकडून नियमित ऑनलाइन मार्गदर्शन दिले जाईल. यामध्ये –

केस डिस्कशन

नियमित ऑनलाइन सुपरव्हिजन, मेंटरिंग सत्र, प्रत्यक्ष कामातील अडचणींचे निराकरण

व्यावसायिक मार्गदर्शन कौशल्य वृद्धीसाठी सातत्यपूर्ण सहाय्याचा समावेश असेल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020) नुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची तरतूद आहे.

रोजगार व करिअर संधी

अमृत मानस मित्र उपक्रमात मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची संधी, मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोजगारक्षम कौशल्ये, सामाजिक संस्थांमधील रोजगाराची संधी आणि व्यावसायिक नेटवर्किंग अशा विविध संधी उपलब्ध आहेत.

पात्रता निकष

खालीलपैकी कोणतीही पदव्युत्तर पदवी असलेले अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र ;

एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र ;

मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्लू).

या क्षेत्रात पूर्वीपासून कार्यरत व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

निवास व्यवस्था

अमृत मानस मित्र हे प्रशिक्षण अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत आहे. तथापि प्रशिक्षणासाठी आवश्यक निवास, भोजन व राहण्याची व्यवस्था उमेदवारांनी स्वखर्चाने करावयाची आहे.

अर्ज कसा करावा? छाननी प्रक्रिया कशी आहे ?

https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा. पात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून, ओरिएंटेशन सत्र आणि इतर आवश्यक परीक्षा/ मुलाखत घेऊन, पात्र व योग्य उमेदवारां ची नावे निश्चित करण्यात येतील. या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन, तसेच प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वानुसार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येतील.

अर्ज कधीपर्यंत करता येईल ?

पहिल्या बॅचसाठी अर्जदारांना 29 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp