Pune | Fri, 15 May 2026

Ad

‘गाडी शिकणे ही आत्मनिर्भरतेची दिशा’: लांजाच्या छाया गांगण यांचा ‘अथर्व मोटार ट्रेनिंग’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा वसा

Sunil Goyal | 15 views
‘गाडी शिकणे ही आत्मनिर्भरतेची दिशा’: लांजाच्या छाया गांगण यांचा ‘अथर्व मोटार ट्रेनिंग’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा वसा

“गाडी शिकणे ही फक्त एक कला नसून ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे,” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून लांजा येथील छाया गांगण यांनी स्वावलंबनाचा एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी केला आहे. आपल्या ‘अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल’च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक महिला व पुरुषांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रितसर प्रशिक्षण देऊन त्यांना खऱ्या अर्थाने ‘स्वयंपूर्ण’ बनविले आहे.

२०१९ मध्ये झाली सुरुवात

छाया गांगण यांनी २०१९ मध्ये अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली. विशेष म्हणजे, या क्षेत्रात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असताना, पती मंदार गांगण यांच्या प्रेरणा आणि सहकार्यामुळे त्यांनी हे आव्हानात्मक पाऊल उचलले. लग्नापूर्वी गाड्यांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आज या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेल्या छाया गांगण यांनी ‘काहीतरी नवीन’ करण्याच्या ध्यासातून सुरू केलेला हा प्रवास आज लांजातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

२५० हून अधिक महिलांना प्रशिक्षण

आजवर या ट्रेनिंग स्कूलमधून सुमारे २५० महिलांनी वाहन चालविण्याचे धडे घेतले आहेत. यामध्ये केवळ तरुणीच नव्हे, तर वयाची साठी ओलांडलेल्यांचाही समावेश आहे. ज्यांना साधी सायकलही चालवता येत नव्हती, त्यांना श्रीमती गांगण यांनी आत्मविश्वासाने गाडी चालवायला शिकविले आहे. यामध्ये नोकरदार महिला व शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पिग्मी एजंट, गृहिणी या सर्वांचा समावेश आहे. महिलांनी केवळ गृहिणी न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीमती गांगण सांगतात.

एसटी बस चालविण्यापर्यंतची मजल

श्रीमती गांगण यांच्या प्रशिक्षणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणजे एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या महिलेने सेवानिवृत्तीला केवळ सहा महिने शिल्लक असताना प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्या केवळ दुचाकी-चारचाकीच नव्हे, तर वर्कशॉपमध्ये एसटी बसही पुढे मागे (Forward-Reverse) करु लागल्या. अनेक महिलांनी तर रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करत स्वतःचे छोटे-मोठे व्यवसायही सुरू केले आहेत.

रस्ता सुरक्षा अभियान आणि सन्मान

केवळ वाहन प्रशिक्षणच नव्हे, तर ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत छाया गांगण यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कुटुंबाचे चाक हाती असणारी महिला मोटार ट्रेनिंग स्कूलचे चाकही यशस्वी पणाने हाती धरु शकते हे दाखवून देणाऱ्या श्रीमती गांगण यांची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

०००

– अमृता भातडे-धुंदूर, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी​

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp