
मुंबई, दि. २९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘महाबीजच्या कार्याचा आणि आगामी कृषी धोरणांचा वेध’ या विषयावर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ३० जून २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. आणि महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार २, शुक्रवार, ३ आणि शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR�
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR�
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR�
महाराष्ट्राच्या कृषी विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाबीजच्या कार्याचा, उपलब्धींचा आणि भविष्यातील कृषी धोरणांचा सविस्तर आढावा या मुलाखतीत घेण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि उच्च उत्पादकता देणाऱ्या बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी महाबीज गेली अनेक दशके कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर महाबीजची स्थापना, संस्थेचा विकास प्रवास, बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, साठवणूक आणि वितरण व्यवस्था याबाबत स्वामी सविस्तर माहिती देणार आहेत.
खरीप हंगाम २०२६ साठी करण्यात आलेले नियोजन, ॲग्री-स्टॅक प्रणालीद्वारे बियाणे पुरवठा, ‘साथी’ (SATI) पोर्टलमुळे वाढलेली पारदर्शकता, तसेच शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही या मुलाखतीत चर्चा होणार आहे. याशिवाय बियाण्यांव्यतिरिक्त महाबीजकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध कृषी सेवा, उत्पादने आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांची माहितीही प्रेक्षकांना मिळणार आहे.
संशोधन आणि विकास क्षेत्रातील महाबीजचे योगदान, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विकसित करण्यात येणारे सुधारित वाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील सहभाग, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), महिला बचत गट आणि युवा उद्योजकांना कृषी मूल्यसाखळीत सहभागी करून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही स्वामी यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
000
जयश्री कोल्हे/स.सं.
