Pune | Tue, 30 June 2026

Ad

 कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलणार – मंत्री गिरीश महाजन

Sunil Goyal | 2 views
 कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलणार – मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. २९ जून २०२६ (जिमाका वृत्तसेवा): त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात या शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे आज दुपारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव  आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येत आहे. ही इमारत सर्वसुविधायुक्त असेल. नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुकास्तरावरील एवढी मोठी राज्यातील तालुकास्तरावरील पहिली इमारत ठरेल.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरा मोहरा बदलेला दिसेल. त्यामुळे या शहराचा जगभर नावलौकिक होईल.

त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असेही नियोजन करण्यात आले आहे. प्रारंभी तहसीलदार श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली.

अशी असेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

त्र्यंबकेश्वर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे क्षेत्र 2001 चौरस मीटर आहे. तळ मजला अधिक चार मजली इमारत असेल. बैठक कक्ष असेल. एकूण 10 हजार 401 चौरस मीटर बांधकाम करण्यात येईल. तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था असेल. या इमारतीत पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1, पंचायत समिती, दुसऱ्या मजल्यावर उपकोषगार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2, उपविभागीय अधिकारी यांचे शिबिर कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, चौथ्या मजल्यावर कृषी, पंचायत समिती, बैठक कक्ष, भांडार कार्यालय असेल, तर पाचव्या मजल्यावर बैठक कक्ष असेल. या इमारतीसाठी एकूण 61 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने 46 कोटी 57 लाख रुपयांच्या रकमेस, तर ग्राम विकास विभागाने 14 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

00000000000

 

 

 

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp