Pune | Fri, 15 May 2026

Ad

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Sunil Goyal | 1 views
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा  – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा. तसेच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी वेळेत पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी. टंचाई निवारण, पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा याबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता सर्व यंत्रणांनी समन्वयाने व संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. या बैठकीस आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तेथे पाणीपुरवठा नियमित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा. पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी सतत समन्वय ठेवावा. जलस्रोतांची उपलब्धता, विहिरींची स्थिती, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि टँकर व्यवस्थापन याचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील गावे, वस्त्या, वाड्या आणि तांडे येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या ठिकाणी फिरते जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. गावांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर पाण्याच्या टाक्या उभारून त्याद्वारेच पाणी वितरण करावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून प्रत्येक नागरिकाला समानतेने पाणी मिळण्यास मदत होईल. टाक्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे गावनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात यावे आणि त्याच वेळापत्रकानुसार पाणी वितरण करण्यात यावे. पाणी वाटपावेळी तलाठी आणि ग्रामसेवक यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. पाणी वितरणामध्ये निष्काळजीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. आरोग्य विभागाने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने नियमित तपासून त्याचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा. दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत पाणीपुरवठ्यासंदर्भात सुरू असलेल्या योजनांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावेत. नादुरुस्त जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन संवेदनशीलतेने कार्य करावे. पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती, पाणीपुरवठा, टँकर व्यवस्थापन तसेच मान्सूनपूर्व तयारीबाबत सविस्तर माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp