Pune | Thu, 14 May 2026

Ad

भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 12 views
भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती

नागपूर, दि. २४ : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराची निर्मिती होत आहे. ही शक्तीची मूर्ती देशभरात नवचेतना जागृत करुन आपल्या साऱ्यांना प्रेरणा देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने भारतदुर्गा मंदिर उभारण्यात येत असून या मंदिराचा शिलान्यास आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. शिलान्यास सोहळ्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, धर्माचार्य श्रीकार्ष्णि पीठाधीश्वर श्री गुरुशरणानंद जी महाराज, श्री जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानन्दजी महाराज, साध्वी ऋतंभरा देवी जी तसेच बागेश्वर धामचे श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री, डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर, उपाध्यक्ष अजय संचेती, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज दोन शिलान्यास कार्यक्रम झाले आहेत. या अनुषंगाने नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट आणि भारत दुर्गा मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. भारत दुर्गा मंदिरातील मूर्ती नवचेतना देईल, प्रेरणा मिळेल. केवळ शक्ती नव्हे तर भक्तीचीही प्रेरणा ठरेल असे ते पुढे म्हणाले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट विषयी बोलताना ते म्हणाले की, गरिबांपर्यंत कर्करोगावरील दर्जेदार उपचार आणि सेवा पोहोचावी हा एनसीआयचा उद्देश होता. त्यातूनच एनसीआयची स्थापना झाली आहे. त्यानंतर आता या परिसरात मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. आज शिलान्यास झालेली नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या दर्जाची असेल, असेही ते पुढे म्हणाले.


भारत निर्माणाचे प्रेरणा स्रोत ठरेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारतदुर्गा मंदिराचा आजचा शिलान्यास सोहळा हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. नव भारत निर्माणाची प्रेरणा यातून आपल्याला मिळेल. नागपूर देशाच्या मध्यस्थानी आहे. त्यामुळे अनेकांसाठी हे ठिकाण येण्यासाठी सोईचे व प्रेरणादायी ठरेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp