Pune | Wed, 24 June 2026

Ad

भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

Sunil Goyal | 3 views
भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

भिवंडी, दि. २४ : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात कारवाई करत दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्यस्तरीय दक्षता पथकाने पारोळ रोडवरील दोन गाळ्यांवर छापा टाकला. तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅस सिलेंडरची साठवणूक करण्यात आल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान ५ किलो वजनाचे ६५३ भरलेले सिलेंडर, ५ किलो वजनाचे ९२ रिकामे सिलेंडर आणि १९ किलो वजनाचे ६ रिकामे सिलेंडर असा एकूण ७५० सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १२ लाख ८० हजार रुपये आहे.

याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी गौतम राऊत तसेच शिधावाटप निरीक्षक रविंद्र राठोड, राजीव भेले, विकास नागदिवे, राहुल इंगळे, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरते आणि पवन कुंभले यांच्या संयुक्त पथकाने केली.

अवैध गॅस साठवणुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याबरोबरच गॅसचा काळाबाजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक व वितरणाविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp