Pune | Mon, 22 June 2026

Ad

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

Sunil Goyal | 1 views
चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

मुंबई, दि. २२ : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील क्षेत्रासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देत असली तरी तिचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि विवेकाने केला गेला पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे. मात्र तिचा वापर करताना चित्रपट निर्माते आणि सर्जकांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सात दिवसांपासून सुरु असलेला मिफ – २०२६ हा लघुकथा, माहितीपट आणि ऍनिमेशन चित्रपटांचा १९ वा द्विवार्षिक महोत्सवाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मिफ हा माहितीपट, लघुकथा आणि ऍनिमेशन चित्रपटांचा प्रतिष्ठित महोत्सव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) परिषदेचे उद्घाटन केले होते. या परिषदेमुळे सर्जनशील अर्थव्यवस्था आणि डिजिटल कथाकथन क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनविण्याच्या देशाच्या आकांक्षेला बळ मिळाले.

यंदाच्या मुंबई चित्रपट महोत्सवामध्ये जगातील ४६ देशांतून १,४५९ चित्रपटांनी सहभाग घेतल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवात ४२ हून अधिक भारतीय भाषा तसेच ३० आंतरराष्ट्रीय भाषांमधील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

माहितीपट समाजातील वास्तवाचे चित्रण करतात, इतिहास जतन करतात, रूढ समजुतींना आव्हान देतात आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देतात. माहितीपट समाजातील विविध घटकांच्या समस्यांना व्यासपीठ देतात आणि भविष्यातील समाज घडविणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतात, असे त्यांनी सांगितले.

भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असल्याचे नमूद करून राज्यपालांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, परंपरा आणि संघर्ष यांवर आधारित कथा मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. महिला चित्रपट निर्मात्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, जेणेकरून त्यांच्या दृष्टिकोनांमुळे भारतीय कथाकथन अधिक समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चित्रपटनिर्मिती अधिक लोकाभिमुख झाली असून नव्या सर्जनशील संधी उपलब्ध झाल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मिफ आणि राज्यातील विद्यापीठांमधील माध्यम व मनोरंजन विभाग यांच्यात अधिक सहकार्य व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. अशा सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक चित्रपट प्रवाहांचा परिचय होईल आणि भविष्यातील सर्जनशील प्रतिभेला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते पोलंडच्या ‘सिल्व्हर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा गोल्डन कॉंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच इराणच्या ‘अंडर द स्नो’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपटासाठीचा सिल्व्हर कॉंच पुरस्कार आणि जर्मनीच्या ‘मायाज साँग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन चित्रपटासाठीचा सिल्व्हर कॉंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्कृष्ट ध्वनी, सर्वोत्कृष्ट संपादक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारोप सोहळ्याला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार, मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार दीपक नारायण, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.

0000

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp