
पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. बोगस बियाणे व खतांच्या तक्रारींवर गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत धडक कारवाई करण्याचे आदेश देतानाच ‘एल-निनो’ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगाम आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार नीलमताई गोऱ्हे, दिलीप वळसे पाटील, शरद सोनवणे, राहुल कुल, विजय शिवतारे, शंकर जगताप, सुनील शेळके, बाबासाहेब काळे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर आणि भीमराव तापकीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रत्यक्ष बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाल्या, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाने निविष्ठा पुरवठा व वितरण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात यावी. नैसर्गिक शेतीचा प्रसार वाढवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावी जनजागृती व मार्गदर्शन करावे. यंदा ‘एल-निनो’च्या संभाव्य परिणामांचा विचार करून शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत आवश्यक बदल करावेत, असेही त्यांनी सांगितले.
महिला शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर ‘ड्रोन दीदी’ योजनेप्रमाणे ड्रोन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगून एकल महिला शेतकऱ्यांना विविध योजनांमध्ये प्राधान्याने सवलती देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील सुधारणांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कडधान्ये, डाळिंब, पेरू, द्राक्ष यांसह विविध पिकांचे नियोजन वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी ऍग्री स्टॅक प्रणालीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात शेती अधिक निर्यातक्षम व व्यावसायिक बनवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खरीप हंगामाच्या तयारीचे सादरीकरण केले. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एमएसपी व एनपीके खतांची पुरेशी उपलब्धता असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यासाठी 1 लाख 94 हजार 500 मेट्रिक टन खत मंजूर असून, 14 मेअखेर 76 हजार 769 मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
खत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, दि. 7 एप्रिल 2026 रोजी सर्व खत उत्पादक व वाहतूकदारांची समन्वय बैठक घेण्यात आली. वस्तुनिष्ठ उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दि. 1 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत विशेष साठा पडताळणी मोहीम राबविण्यात आली. पॉस प्रणाली व प्रत्यक्ष साठा तपासणीत विसंगती आढळून सुमारे 5 हजार मेट्रिक टन काल्पनिक साठा कमी करण्यात आला.
पॉस प्रणालीवरील साठा अद्ययावत न ठेवणाऱ्या 17 वितरकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पॉस प्रणाली हाताळणी, अभिलेख अद्ययावत ठेवणे आदी विषयांवर वितरकांना प्रशिक्षण देण्यात आले. खत विक्रीत लिंकिंगला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक दुकानात जनजागृती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निरीक्षकनिहाय खत नमुने घेण्याचे नियोजन तयार करण्यात आले असून रेक पॉईंटनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करून पुरवठ्यावर देखरेख वाढविण्यात आली आहे. खत साठा, वितरण व उपलब्धतेवर नियमित नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन यंदाच्या खरीप हंगामात अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
00000
