Pune | Tue, 21 April 2026

Ad

कोल्हापूर चित्रनगरी व एन.डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर; महसूलवाढीसाठी स्वतंत्र धोरण तयार करावे -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

Sunil Goyal | 1 views
कोल्हापूर चित्रनगरी व एन.डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर; महसूलवाढीसाठी स्वतंत्र धोरण तयार करावे  -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. २१ : राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर चित्रनगरी तसेच कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची 168 वी बैठक मुंबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात चित्रनगरीचा आगामी वर्षांचा 18 कोटी महसूल वाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला. यावेळी मंत्री ॲड.शेलार यांनी उपलब्ध संरचनेचा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध वापर करण्यावर भर दिला.

मंत्री शेलार म्हणाले की, राज्यातील चित्रनगरी व स्टुडिओ संकुलांमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त मोकळी जागा आणि आकर्षक लोकेशन्स उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर नियोजनपूर्वक केल्यास चित्रीकरणाच्या कामावर परिणाम न होता पूरक स्वरूपात विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदींसाठी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. यामुळे संस्थेच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना चित्रीकरणास प्राधान्य देत वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, स्वतंत्र झोन निश्चिती, कार्यक्रमांसाठी परवानगी प्रक्रिया, भाडे दरांची पारदर्शक रचना, ऑनलाईन बुकिंग प्रणाली, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, स्टुडिओमधील तांत्रिक उपकरणे, सेट्स आणि सर्जनशील वातावरण सुरक्षित राहील यासाठी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक राहील, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या उपक्रमामुळे चित्रनगरींचा वापर अधिक परिणामकारक होऊन महसुलात वाढ होईल, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री ॲड.शेलार यांनी व्यक्त केला.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू तसेच बैठकीस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp