Pune | Thu, 25 June 2026

Ad

मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा – बदंरे मंत्री नितेश राणे

Sunil Goyal | 1 views
मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा – बदंरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २५ : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा मंत्रालयातील दालनात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिघी मच्छिमार जेट्टी प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच जेट्टी परिसरातील गाळ काढण्याच्या कामाबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जेट्टीच्या दुरुस्तीची तसेच गाळ काढण्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. मच्छिमारांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp