Pune | Fri, 15 May 2026

Ad

महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला ‘आयएसओ’ नामांकन

Sunil Goyal | 1 views
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला ‘आयएसओ’ नामांकन

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅडर्डायझेशन) नामांकन मिळाले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागाने हे यश मिळविले आहे. जनसंपर्क विभागामध्ये महाराष्ट्रात आयएसओ नामांकन मिळविणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग पहिलाच ठरला आहे.

महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकेमध्ये क्यू-आर कोड, पॉडकास्ट आणि डिजिटल संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती सादरीकरणाला आधुनिक रूप दिले. जाहिराती आणि जनजागृती मोहिमांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारा हा विभाग राज्यातील अग्रगण्य विभाग म्हणून ओळखला जातो.

विशेष म्हणजे, जनसंपर्क क्षेत्रात तब्बल १५ पुरस्कार पटकाविण्याचा विक्रमही महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने आपल्या नावावर केला आहे. आयएसओ नामांकनामुळे महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दरम्यान, महापारेषणच्या जनसंपर्क विभागाचे आयएसओ नामांकनचे प्रमाणपत्र लेखानिबंधक श्री. विजयकुमार स्वामी यांनी अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, जनसंपर्क विभागाचे श्री. श्रीकांत जाधव उपस्थित होते.

जनसंपर्क विभाग अग्रेसर : डॉ. संजीव कुमार

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. विशेषतः सोशल मीडियाव्दारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेडस) जनसंपर्क विभागाने महापारेषणची भूमिका लोकांसमोर सकारात्मकपणे ठळकपणे मांडली. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण अभिनव कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.

0000

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp