
छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) – जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रे’चे छत्रपती संभाजीनगर मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहाता जलयात्रा आता लोकचळवळ झाली असून मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न निर्धारीत वेळेत सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र चोंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून एकाच वेळी या दोन ठिकाणांहून जलयात्रेचा शुभारंभ दि.२५ रोजी करण्यात आला. आज ही यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाली. वैजापूर येथे आ.रमेश बोरनारे गंगापूर मध्ये आ.प्रशांत बंब यांनी यात्रेचे स्वागत केले.
छत्रपती संभाजीनगर शहरात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी जलयात्रेचे स्वागत केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.खा.रामराव वडतुके, खा.संदीपान भुमरे आणि आ.विलास भुमरे,आ.अनुराधा चव्हाण आ.गोपीचंद पडळकर,सदाभाऊ खोत उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विचार, वारसा आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे, हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जल व्यवस्थापनाचे केलेले कार्य हे आमच्यासाठी आदर्शवत असल्यामुळे त्यांच्या नावाने सुरू केलेली यात्र निश्चित राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या मंगळवार दि.२८ रोजी यात्रा कन्नड, चाळीसगाव मार्गे धुळे येथे पोहोचेल. पुढे दि. २९ रोजी धुळे ते महेश्वर (मध्य प्रदेश) असा प्रवास करून या जलयात्रेचा समारोप होणार असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
