Pune | Thu, 02 July 2026

Ad

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाला गती द्यावी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Sunil Goyal | 1 views
मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाला गती द्यावी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि.२: मुनावळे जलपर्यटन प्रकल्प हा राज्याच्या पर्यटन विकासासाठी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आज विधानभवनात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलपर्यटन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील जलपर्यटनाला नवी चालना देणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच सातारा जिल्हा राज्यातील महत्त्वाचे जलपर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मुनावळे (शिवसागर जलाशय) परिसराचा जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या भागातील समृद्ध नैसर्गिक संपदा आणि उपलब्ध जलसाठ्यामुळे पर्यटन विकासाला मोठी संधी उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले.

मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाचा आराखडा, प्रस्तावित मंजुरी, आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता आणि विविध विभागांच्या परवानग्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री देसाई यांनी दिले. तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेचे नियोजन आणि विभागांमधील समन्वय राखण्याचेही निर्देश दिले.

कोयना जलाशय परिसरात जागतिक दर्जाच्या जलपर्यटन सुविधा उभारण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या अंतर्गत नौकाविहार, जलक्रीडा, पर्यटक सुविधा केंद्र आणि अन्य पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार हा निधी सुमारे ९२ कोटींपेक्षा अधिक करण्यात आला आहे. विविध विभागांच्या आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

याच बैठकीत किल्ले प्रतापगडावरील पर्यटन विकासाचाही आढावाही यावेळी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे आणि उपसचिव विजय पोवार उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

***

संध्या गरवारे/विसंअ

 

 

 

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp