Pune | Thu, 25 June 2026

Ad

परिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराज

Sunil Goyal | 2 views
परिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराज

अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा नवा आदर्श घालून देणाऱ्या, समाजाला प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या लोकराजाला मानाचा मुजरा… त्यांच्या १५२ व्या जयंती निमित्त…

२६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात यशवंतराव म्हणून जन्मलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे अधिपती नव्हते, तर सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि मानवतेचे युगप्रवर्तक विचारवंत होते. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेल्यानंतर आणि २ एप्रिल १८९४ रोजी राज्यकारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सत्ता ही जनकल्याणाचे साधन असते, हे आपल्या कार्यातून सिद्ध केले. म्हणूनच त्यांना ‘लोकराजा’ आणि ‘लोककल्याणकारी राजा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासन त्यांच्या जन्मदिनाचे ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून पालन करते, ही त्यांच्या कार्याची सर्वोच्च पावती आहे.

शाहू महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक विचारांचा गाढा प्रभाव होता. समाजातील विषमता, जातिभेद, अज्ञान आणि दारिद्रय यांचे मूळ शिक्षणाच्या अभावात आहे, हे त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हा त्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आहे. १९१७ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण लागू केले. प्रत्येक गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण, गरीब आणि वंचित मुलांनाही शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणून विविध समाजघटकांसाठी वसतिगृहे उभारली. म्हणूनच त्यांना भारतातील वसतिगृह चळवळीचे आद्य जनक मानले जाते.

आजच्या काळात शिक्षणाची व्याप्ती वाढली असली, तरी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्ये आणि समान संधी अधिक सुधारण्याची गरज आहे. शाहू महाराजांनी दिलेला संदेश स्पष्ट होता—शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे, तर विचारक्षम, जबाबदार आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी असते. आजच्या तरुणांनी त्यांच्या या विचाराचा स्वीकार करून ज्ञानासोबत सामाजिक संवेदनाही जोपासणे आवश्यक आहे.

शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ मांडली नाही, तर ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली. १९०२ मध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षण लागू केले. भारतातील आरक्षणाच्या धोरणाचा हा पहिला ऐतिहासिक प्रयोग होता. सार्वजनिक विहिरी, शाळा, दवाखाने आणि सरकारी कार्यालये सर्वांसाठी खुली केली. अस्पृश्यता, वेठबिगारी, महार वतने, जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी कायदे करून कठोर भूमिका घेतली. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण आणि महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी प्रगतिशील निर्णय घेतले. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस हा प्रथम माणूस होता; जात, धर्म किंवा पंथ हे दुय्यम होते.

राजर्षी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक सुधारणा केल्या नाहीत, तर आर्थिक आणि कृषी विकासालाही समान महत्त्व दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठा उभारल्या, राधानगरी धरणासारखे दूरदृष्टीचे प्रकल्प राबवले, सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि उद्योगधंद्यांना चालना दिली. तांत्रिक शिक्षण, लष्करी शिक्षण आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी स्वावलंबी समाजाची पायाभरणी केली. विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन आजच्या ‘शाश्वत विकास’ या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे.

शाहू महाराजांनी कला, क्रीडा आणि संस्कृतीलाही तितकेच महत्त्व दिले. संगीत, नाटक, चित्रकला आणि कुस्तीला त्यांनी राजाश्रय दिला. बालगंधर्व, केशवराव भोसले, बाबूराव पेंटर यांसारख्या अनेक प्रतिभांना त्यांनी प्रोत्साहन दिले. समाजाचा विकास केवळ अर्थकारणाने होत नाही; संस्कृती, कला आणि मानवी मूल्ये यांच्यामुळेच राष्ट्र समृद्ध होते, हा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांनी दिलेले पाठबळ, मूकनायक या वृत्तपत्राला केलेले साहाय्य आणि दलित समाजाच्या नेतृत्वाबाबत व्यक्त केलेला विश्वास यामुळे भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात शाहू महाराजांचे स्थान अधिक उंचावते. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून शासन चालवले. सत्ता ही विशेषाधिकार नसून जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या प्रत्येक निर्णयातून दाखवून दिले.

६ मे १९२२ रोजी अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले; परंतु त्यांच्या विचारांचे आयुष्य आजही अखंड सुरू आहे. आधुनिक भारतात समता, सामाजिक न्याय, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण, सर्वसमावेशक विकास आणि मानवी हक्क यांविषयी जे विचार आपण स्वीकारतो, त्यांची बीजे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वीच रोवली होती.

आजच्या तरुण पिढीसमोर तंत्रज्ञान, स्पर्धा आणि जागतिक संधींचे नवे क्षितिज खुले झाले आहे. अशा वेळी शाहू महाराजांचा आदर्श आपल्याला सांगतो की, खरे शिक्षण तेच, जे स्वतःला उन्नत करताना समाजालाही उभारी देते; खरा विकास तोच, जो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो; आणि खरे नेतृत्व तेच, जे सत्तेपेक्षा सेवेला मोठे मानते. म्हणूनच राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ इतिहासातील महान राजा नाहीत, तर भविष्याचा मार्ग दाखवणारे लोकनेते आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे, समतेचा समाज घडवणे आणि शिक्षणातून मानवतेची उभारणी करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.

 

संकलन व लेखन – सचिन अडसूळ,

जिल्हा माहिती अधिकारी,

कोल्हापूर

0000

 

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp